राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करणे सुरू
सिल्लोड ( शेख चांद प्रतिनिधी ) दि.22 सिल्लोड – सोयगाव तालुक्यात विविध ठिकाणी गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने कांदा, गहू, मका , सूर्यफूल इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले होते. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहेत. सोमवार ( दि.22 ) रोजी तालुक्यातील चारनेर, चारनेरवाडी, धारला, आमठाणा, देऊळगाव बाजार इत्यादी भागात महसुल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपिटीने नुकसान झालेल्या घाटनांद्रा, धारला, आमठाणा इत्यादी भागाची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतातील बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तेथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते. नेमकी किती नुकसान झाले हे समोर आल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल असे सूतोवात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले होते. त्याअनुषंगाने प्रशासनाच्या वतीने सोमवार पासून तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहेत.
प्रभारी तहसीलदार संजय सोनवणे, महसुल मंडळ अधिकारी शंकरलाल जैस्वाल, तलाठी गिरीष झाल्टे,तलाठी संजय जोशी, कृषी मंडळ अधिकारी श्री. सपकाळ, श्री. डापके, कृषी सहाय्यक श्री बोचरे आदी महसुल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पणे पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत.
फोटो कैप्शन :- तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतांना प्रभारी तहसीलदार संजय सोनवणे यांच्यासह महसुल व कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी दिसत आहेत.