कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी प्रभावी अंमलबजावणी करा -पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
Summary
नागपूर, दि.18: जिल्ह्यात झपाट्याने वाढणारा कोराना विषाणूचा प्रादूर्भाव व होणाऱ्या प्रसाराला रोखण्यासाठी तसेच नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय पथकाने सुचविलेल्या मार्गदर्शक सूचना व शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. कोविड आजाराबाबत सर्वत्र दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक […]
नागपूर, दि.18: जिल्ह्यात झपाट्याने वाढणारा कोराना विषाणूचा प्रादूर्भाव व होणाऱ्या प्रसाराला रोखण्यासाठी तसेच नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय पथकाने सुचविलेल्या मार्गदर्शक सूचना व शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.
कोविड आजाराबाबत सर्वत्र दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा. नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वोत्तम निरीक्षण करावे. कॅन्टेमेंट प्लॉननुसार प्रतिबंधीत क्षेत्रात अधिक प्रमाणात घरोघरी जावून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे निरीक्षण करावे. तसेच आयएलआय व सारीच्या रुग्णांवर पाळत ठेवावी. या कामासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, व खाजगी डॉक्टरांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
प्रत्येक रुग्णांमागे कमीत कमी 20 ते 30 जवळचे संपर्कातील सदस्य, शेजारी यांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग व ट्रॅकींग करावे. तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची काटेकोरपणे तपासणी करावी. यासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. चाचण्याची संख्या वाढविल्यास वेळीच कोविड रुग्णांची नोंद होवून त्यांच्यावर उपचार करता येतील. आरटीपीसीआर मुख्य आधार असला तरी त्यानुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कॅन्टेमेंट झोन आणि बसस्थानक, रेल्वे स्टेशन, झोपटपट्टी व जास्त घनता असलेल्या अति जोखमीच्या क्षेत्रात रॅट किटस् चाचणीसाठी वापर करा. कॅन्टेमेंटबाबत शासनाने आखलेले धोरण अंमलात आणा. पॉझिटिव्ह प्रकरणांची संपर्क सूची आणि संपर्काचे डिजीटल मॅपींग, मोठ्या प्रमाणात करुन प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात यावेत. बफर झोन निश्चित करणे आवश्यक आहे. झोनमध्ये आवागमनावर नियंत्रण ठेवावे व जलद प्रतिसाद पथकाद्वारे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
गृह विलगीकरणातील रुग्णांचा आरोग्य विभागामार्फत आढावा घेवून होम आयसोलेशन करतांना आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. रुग्णांचे ऑक्सिजन पातळी नियमितपणे तपासावी. आवश्यकता असल्यास रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात दाखल करावे.
विविध रोगाने आजारी रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. आवश्यक सेवा वितरीत करण्यासाठी कोरोना योध्दाच्या मनातील लसीकरणाबाबतची भिती व संकोच दूर करावा. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण, कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग, कॅन्टेमेंट ऑपरेशन, होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांवर पाळत ठेवावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
कोविड रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील विवेक हॉस्पीटल, सुभाष नगर येथे व्हॅक्सीनेशन सेंटर सुरु करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र दिले असून त्याबाबत शासन मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
कडकडीत लॉकडाऊन पाळा
जिल्ह्यामध्ये 15 ते 21 या काळामध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे. मात्र अजूनही नागरिक गंभीरतेने या बाबी घेतांना दिसत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रुग्ण संख्या वाढीला नियंत्रण करण्यासाठी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. प्रशासन मोठ्या प्रमाणात चाचण्या लसीकरण आणि रुग्ण संख्येत घट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे प्रशासनाला सर्व पद्धतीने साथ द्यावी. वेळोवेळी निघणाऱ्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले आहे.