BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

चित्रनगरी महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीची कर्मभूमी – मंत्री ॲड. आशिष शेलार ‘चित्रनगरीत विविध उपक्रमांचे लोकार्पण

Summary

मुंबई, दि. १७ : दादासाहेब फाळके चित्रनगरी ही केवळ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे ठिकाण नसून महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीची कर्मभूमी आहे. कलाकारांसाठी अधिक सुविधा, तंत्रज्ञांसाठी नव्या संधी आणि युवा पिढीसाठी आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. […]

मुंबई, दि. १७ : दादासाहेब फाळके चित्रनगरी ही केवळ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे ठिकाण नसून महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीची कर्मभूमी आहे. कलाकारांसाठी अधिक सुविधा, तंत्रज्ञांसाठी नव्या संधी आणि युवा पिढीसाठी आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत विविध लोकसेवा व सांस्कृतिक उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला फिल्मसिटी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सहव्यवस्थापक प्रशांत साजणीकर, एनजीएमएच्या संचालक निधी चौधरी त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ, गायक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी चित्रनगरीतील स्टुडिओ क्रमांक एकचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. दर्जेदार पायाभूत सुविधांमुळे कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञांना चित्रीकरण व निर्मितीसाठी अधिक सुविधा मिळणार असून चित्रनगरीला आधुनिक निर्मिती केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांच्या उपस्थितीत कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी ‘डॉक्टर्स फॉर यू’च्या माध्यमातून दोन नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. यापूर्वीच्या एका रुग्णवाहिकेसह आता चित्रनगरीत तीन रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. तसेच तंत्रज्ञ, निर्मिती संस्थांचे कर्मचारी आणि संबंधित मनुष्यबळासाठी विनामूल्य बससेवा सुरू करण्यात आली आहे

चित्रनगरीतील अग्निसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तीन टप्प्यांत उभारलेल्या या यंत्रणेत प्रत्येक टप्प्यासाठी १५ लाख लिटर क्षमतेची अग्निशमन पाणी साठवण टाकी आणि स्वतंत्र फायर पंप प्रणाली आहे. यामुळे १५ स्टुडिओंसह प्रशासकीय इमारत, हेलिपॅड, खंडाळा घाट आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या निवासस्थान परिसराची अग्निसुरक्षा अधिक सक्षम झाली आहे. अंतिम अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणारी महाराष्ट्र शासनाची पहिली शासकीय मालमत्ता म्हणून चित्रनगरीने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. नूतन समिती कक्षाचेही मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार म्हणाले की, युवा पिढीला डिजिटल माध्यमातून कला सादरीकरणाची संधी मिळावी यासाठी रील स्पर्धा व रील व्यवसाय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ‘श्री महागणपतिस्तोत्र’ संगीत व्हिडिओ आणि ‘अभंग रिपोस्ट’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भक्ती व संगीत परंपरेला आधुनिक माध्यमांची जोड देण्यात आली आहे.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि चित्रनगरीच्या संयुक्त विद्यमाने ‘लेन्स अँड लेगसी : बॉलिवूडचा दृक्-प्रवास’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे मंत्री शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा प्रवास दुर्मीळ छायाचित्रे, पोस्टर्स आणि अभिलेखीय साहित्याच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाढदिवस साजरा करण्याऐवजी ‘सेवा संकल्प’ घेऊन समाजासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जनसेवा, कर्मचारी सेवा आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या उत्थानासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या निमित्ताने नागरिकांनीही सेवाभावाची भावना जोपासत देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे. विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देण्याचा दृढनिश्चय करावा, असे आवाहनही ॲड. शेलार यांनी केले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *