महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील अपघाताबाबत एम.एस.आर.डी.सी कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी) तात्काळ कार्यान्वित

Summary

वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी व बिस्किटांचे वितरण तज्ज्ञांच्या पथकाने दोन ठिकाणची वायू गळती पूर्णपणे थांबवली, तिसरी गळतीही नियंत्रणात मुंबई दि.४ : यशवंतराव चव्हाण (मुंबई-पुणे) द्रुतगती महामार्गावरील अपघाताबाबत घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) कडून आपत्कालीन प्रतिसाद […]

  • वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी व बिस्किटांचे वितरण
  • तज्ज्ञांच्या पथकाने दोन ठिकाणची वायू गळती पूर्णपणे थांबवली, तिसरी गळतीही नियंत्रणात

मुंबई दि.४ : यशवंतराव चव्हाण (मुंबई-पुणे) द्रुतगती महामार्गावरील अपघाताबाबत घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी) तत्काळ कार्यान्वित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी आय.आर.बी.एम.पी.ई.पी.एल.मार्फत पिण्याचे पाणी व बिस्किटांचे वितरण करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन संबंधित टोल नाक्यांवर तात्पुरत्या स्वरूपात टोलमुक्त प्रवेश व निर्गमन सुविधा देण्यात आली.

अपघातग्रस्त टँकर हटवून वाहतूक पूर्ववत सुरु करण्याची प्रक्रिया वेगात

दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रासायनिक तज्ज्ञांच्या पथकाने टँकरवरील दोन ठिकाणची वायू गळती पूर्णपणे थांबवली असून तिसरी गळतीही मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता अपघातग्रस्त टँकरमधील वायू सुरक्षित टँकरमध्ये स्थानांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अपघातग्रस्त टँकर हटवून मुंबई वाहिनीवरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे एम.एस.आर.डी.सी.कडून कळवण्यात आले.

यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील मुंबई वाहिनीवर कि.मी. ४१/२०० येथे, अडोशी बोगद्याजवळ (बोरघाट विभागात) दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारा रासायनिक वायू वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील असा प्रॉपिलीन वायू भरलेला होता. अपघातानंतर टँकरच्या ट्रेलरवरील तीन व्हॉल्व्हना नुकसान झाल्याने वायू गळती सुरू झाली. क्विक रिस्पॉन्स वाहने, रुग्णवाहिका, डेल्टा फोर्स, पेट्रोलिंग कर्मचारी, अग्निशमन उपकरणे तसेच आवश्यक यंत्रसामग्री घटनास्थळी तत्काळ तैनात करण्यात आली. यासोबतच टाटा स्टील आणि खोपोली नगरपरिषद येथून अतिरिक्त अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्यात आले. वायू अत्यंत ज्वलनशील असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीने मुंबई वाहिनीवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायंकाळी ७.३० वाजता महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांमधील मध्य बॅरीअर हलवून पुणे वाहिनीवरील एक लेन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली. पुण्याकडे जाणारी वाहतूक उर्वरित दोन लेनमधून सुरू ठेवण्यात आली. तसेच मुंबईकडे जाणारी हलकी वाहतूक मॅजिक पॉइंट येथून खोपोली (जुना महामार्ग) मार्गे वळविण्यात आली.

रासायनिक तज्ज्ञांचे पथक रात्री ८.३० वाजता तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) रात्री १०.२० वाजता घटनास्थळी दाखल झाले. मात्र, टँकरच्या व्हॉल्व्हचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्या वेळी गळती पूर्णपणे थांबवणे शक्य झाले नाही.

मदतीबाबत सोशल मिडियावरुनही माहिती

दरम्यान, एम.एस.आर.डी.सी.मार्फत एफ.एम. रेडिओ, सोशल मीडिया व अन्य माध्यमांद्वारे प्रवाशांना द्रुतमार्गावरील वाहतूक परिस्थितीबाबत सातत्याने माहिती देण्यात आली. अत्यावश्यक कारणांशिवाय प्रवास टाळण्याचे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. किवळे येथून मुंबई वाहिनीवर वाहनांचा पुढील प्रवेश रोखण्यासाठीही योग्य उपाययोजना करण्यात आल्या.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *