पद्मश्रीचा मान, उद्योगविश्वाचा अभिमान! सोलार समूहाचे संस्थापक सत्यनारायण नुवाल यांचा गौरव, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या शुभेच्छा
Summary
नागपूर / कोंढाळी | प्रतिनिधी देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सोलार समूहाचे संस्थापक व नामवंत उद्योजक सत्यनारायण नुवाल यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उद्योग, प्रशासन, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू असून […]
नागपूर / कोंढाळी | प्रतिनिधी
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सोलार समूहाचे संस्थापक व नामवंत उद्योजक सत्यनारायण नुवाल यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उद्योग, प्रशासन, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू असून हा सन्मान संपूर्ण औद्योगिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरत आहे.
या गौरवाच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सत्यनारायण नुवाल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पद्मश्री पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. या भेटीत सन्मान, आदर आणि प्रेरणेची भावना प्रकर्षाने जाणवत होती.
“हा सन्मान १५ हजार कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा” – नुवाल
सन्मान स्वीकारताना सत्यनारायण नुवाल यांनी अत्यंत नम्रतेने प्रतिक्रिया व्यक्त केली.
ते म्हणाले,
“हा पुरस्कार केवळ माझा नसून सोलार समूहाशी जोडलेल्या सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रम, निष्ठा आणि समर्पणाचा हा गौरव आहे. त्यांच्या योगदानाशिवाय हे यश शक्य झाले नसते.”
भारत सरकारप्रती कृतज्ञता
यावेळी नुवाल यांनी भारत सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की,
“माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी आणि या सन्मानासाठी मला पात्र समजल्याबद्दल भारत सरकारचे मनःपूर्वक आभार. हा पुरस्कार आम्हाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता अधिक मजबूत करण्याची तसेच राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सातत्याने योगदान देण्याची प्रेरणा देईल.”
आत्मनिर्भर भारताचे मजबूत पाऊल
संरक्षण उत्पादन, औद्योगिक नवोपक्रम आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानात सत्यनारायण नुवाल यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली सोलार समूहाने देशाच्या संरक्षणात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असून भारताला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत.
नवउद्योजकांसाठी प्रेरणास्थान
पद्मश्री पुरस्कारामुळे नागपूरसह संपूर्ण देशातील औद्योगिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मेहनत, शिस्त, राष्ट्रनिष्ठा आणि समर्पण यांच्या बळावर यशस्वी झालेल्या सत्यनारायण नुवाल यांचा हा सन्मान नवउद्योजक, युवक आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
खऱ्या अर्थाने, सत्यनारायण नुवाल यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार म्हणजे उद्योग, राष्ट्रसेवा आणि आत्मनिर्भरतेच्या विचारधारेचा सन्मान आहे.
