रोजंदारी मजदूर सेनेच्या लढ्याला यश; चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील सहा कंत्राटी कामगारांना पुन्हा रोजगार व न्याय
Summary
चंद्रपूर | प्रतिनिधी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राट संपल्याचे कारण देत कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आलेल्या सहा कंत्राटी कामगारांना अखेर रोजंदारी मजदूर सेना संघटनेच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे पुन्हा रोजगार व न्याय मिळाला आहे. या यशामुळे कामगार वर्गात समाधानाचे […]
चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राट संपल्याचे कारण देत कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आलेल्या सहा कंत्राटी कामगारांना अखेर रोजंदारी मजदूर सेना संघटनेच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे पुन्हा रोजगार व न्याय मिळाला आहे. या यशामुळे कामगार वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील डब्ल्यू.टी.पी. 210 मेगावॅट विभागात एम./एस. बी.एम. काळे या अस्थापनेअंतर्गत AMC for Gear Box & Auxiliary Maintenance of Cooling Tower Fan या कंत्राटात गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून कार्यरत असलेले निखिल मनोहर किन्नाके, प्रकाश पुंडलिक आसुटकर, पांडुरंग गणपत गोने, प्रविण मधुकर हुळे, कपिल केशव सुखदेवे व पवन प्रविण मानकर या सहा कामगारांना दिनांक 8 मे 2025 रोजी अचानक कामावरून कमी करण्यात आले होते. टेंडर संपला असून नवीन कंत्राट निघालेले नाही, असे कारण प्रशासनाकडून देण्यात आले होते.
नवीन कंत्राटाच्या प्रतीक्षेत या सहा कामगारांनी तब्बल सात महिने वाट पाहिली. मात्र, टेंडर निघाले नसल्याने हे सर्व कामगार बेरोजगार झाले. घरचे एकमेव कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या कुटुंबांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली होती.
अखेर दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी या सहा कामगारांनी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्हचे विदर्भ अध्यक्ष भाई सदानंद पुंडलिक देवगडे यांच्याकडे लेखी तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच भाई सदानंद देवगडे यांनी तात्काळ चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाकडे संघटनेच्या वतीने तक्रार नोंदवून सातत्याने पाठपुरावा केला.
संघटनेच्या दबावामुळे प्रशासनाला अखेर नवीन कंत्राटाची ऑर्डर काढावी लागली. परिणामी दिनांक 19 डिसेंबर 2025 पासून या सहा कामगारांना त्यांच्या पूर्ववत कामावर पुन्हा रुजू करून घेण्यात आले. यामुळे त्यांना रोजगारासह न्याय मिळाला.
या आनंदाच्या क्षणी, सहा कामगारांनी आज मेजर गेटसमोर पुष्पगुच्छ देऊन भाई सदानंद पुंडलिक देवगडे (विदर्भ अध्यक्ष), भाई सुभाषसिंग बावरे (केंद्रीय प्रभारी), भाई विवेकानंद मेश्राम (शाखा अध्यक्ष), भाई दिवाकर डबले (जिल्हा संघटक), भाई दीपक बेलगे (जिल्हा उपाध्यक्ष), भाई डोमेश्वर धपाडे (जिल्हा सचिव), भाई सुरज शेंडे (शाखा सहसचिव), भाई सागर किन्नाके (जिल्हा कार्याध्यक्ष), भाई प्रबुद्ध डांगे (शाखा कार्याध्यक्ष) व भाई देवचंद गणवीर (शाखा कोषाध्यक्ष) यांचे मनःपूर्वक आभार मानले.
भविष्यात संघटनेशी एकनिष्ठ राहून संघटना मजबूत करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असे मत कामगारांनी व्यक्त केले. यावेळी “रोजंदारी मजदूर सेनेचा विजय असो” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.
संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर
