तुरुंगात मृत्यू आलेल्या काॅ.कांचन नन्नावरे यांना ॲड.सुरेंद्र गडलिंग यांचे खुले पत्र
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. ९ एप्रिल २०२१
ज्येष्ठ वकील आणि भीमा कोरेगाव प्रकरणात इतर अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यां सोबत युएपीए अंतर्गत अटक झालेले सुरेंद्र गडलिंग यांनी कालवश कांचन नन्नावरे यांना उद्देशून लिहिलेलं पत्र इंडी जर्नलकडे आलं आहे. कांचन नन्नावरे या दलित-आदिवासी कार्यकर्त्या होत्या व त्यांच्यावर नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा आरोप होता. मात्र ३० जानेवारीला पोलीस कोठडीतच त्यांचा दुर्धर आजारानं मृत्यू झाला. अनेक सामाजिक कार्यकर्ते व दलित-आदिवासी व डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचे खटले लढणारे आणि आता स्वतःच एका प्रकारचे राजकीय कैदी असलेले गडलिंग यांनी नन्नावरे यांना उद्देशून हे पत्र लिहिलं आहे. पत्रात गडलिंग राजकीय कैदी, न्यायव्यवस्था आणि भाजप-संघावर तिखट टिप्पणी करताना नन्नावरे यांना आपण मदत करू शकलो नाही अशी खंत व्यक्त करताना दिसतात. पत्राचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे.
प्रिय कांचन,
तुझ्या नावाने लिहिलेलं हे पत्र आता तू वाचू शकत नाहीस आणि कुणी तुला हे वाचूनही दाखवू शकत नाही. हे पत्र तुझ्या पर्यंत पोहोचू शकत नाही, कारण तू नाहीयेस आता. तू गेलीस आमच्यातून, या भूवतालातून. तुरुंगातील सात वर्षांच्या दमनाशी आणि तुझ्या दुर्धर आजाराशी अविरत चालणारा तुझा संघर्ष आज थांबलाय. या फॅसिस्ट व्यवस्थेनं जीव घेतलाय तुझा! हा तुझा मृत्यू म्हणजे एक संस्थात्मक खून आहे, असे मी समजतो. त्यामुळे हे पत्र नाही पोहोचू शकणार तुझ्यापर्यंत याची जाणीव आहे मला. पण हे पत्र तुझ्या स्मृतींनी भरलेल्या सर्व काळजांपर्यंत निश्चित पोहोचेल. हे पत्र तुझ्या शहादतीत अंगार पेटलेल्या त्या सर्व डोळ्यांपर्यंत पोहोचेल. हे पत्र फॅसिस्ट शासनाविरोधात उगारलेल्या त्या प्रत्येक मुठीपर्यंत पोहचेल असा मला विश्वास आहे. जगण्याचा आणि जगतांना या जनविरोधी सत्तेविरोधात लढत राहण्याचा आणि आज ना उद्या क्रांतीच्या या मूलभूत संघर्षात विजयी होण्याचा तुझा आशावाद हा खरंच उन्नत होता. तो तुझा उन्नत, उदात्त आशावाद आज आम्हालाही जगण्यासाठी आणि लढण्यासाठी पाठबळ देत राहील. केस सुरु असताना केस संदर्भात बोलू नये, लिहू नये असं म्हणतात. परंतु हे नियम आज मला मोडावेच लागतील. कारण केस संपण्याची वाट पाहत पाहत तू संपून गेलीस काही न बोलता. पण आता मला बोलावंच लागेल, कारण मी नाही वाट पाहू शकत केस संपण्याची. निदान आता तरी नाही. कारण केस संपण्याची वाट पाहता पाहता उद्या मीही संपून जाईल. मग या विषयावर माझ्यातर्फे कोण बोलणार? तुझी दृढता ही खरंच खूप अभेद्य होती. ना तुरुंग, ना दमन, ना हे आजारपण, कोणीही तुला या जात-वर्ग-स्त्री दास्य अंताच्या चळवळीपासून तोडू शकलं नाही. जीवन जगण्याची इच्छा सर्वांनाच असते, तशी तुलाही होती. पण तुझी जीवन जगण्याची इच्छा सामाजिक संवेदनांनी आच्छादलेली होती. जग बदलणाऱ्या क्रांतिकारी विचारधारेवर तुझी जीवन इच्छा फुलली होती. तेव्हा सतत संघर्षशील राहण्याची तुझी इच्छाशक्ती अशी सुगंध बनून दरवळत राहील. या तुझ्या जीवन प्रवासाने उधळलेली क्रांतीफुलं कधीच कोमेजणार नाहीत. ही फुलं त्यांचा आशावाद आणि प्रेरणादायी सुगंध आमच्या भोवताल सतत घेऊन दरवळत राहतील. कांचन, एक मानवाधिकार कार्यकर्ता वकील म्हणून मला तुझी क्षमा मागावीशी वाटते. कारण तुला तुरुंगातून सोडवण्याचा प्रयत्न करण्यात मी कमी पडलो. तुझ्या सारखे कार्यकर्ते असे उधाणल्यासारखे आपले सर्वस्व जनचळवळीला अर्पण करतात. तुरुंग, देशद्रोहाच्या केसेस अशी कोणतीही पर्वा न करता चालत राहतात मजल-दरमजल करीत. अनेक खाचखळगे, काट्यांना तुडवत तुडवत कधी व्यवस्थेशी, कधी घरच्यांशी, कधी स्वतःशी तर कधी परिस्थितीशी एक संघर्ष करत न थांबता तुम्ही चालतच राहता. अशा वेळी कोर्ट-कचेरी आणि तुरुंगाच्या जंजाळामध्ये अडकवून ही व्यवस्था नियोजनबद्धपणे तुमचा हा प्रवास रोखू पाहते, तुम्हाला दडपू पाहते, तुम्हाला घाबरवून या वाटेवरून परावृत्त करू पाहते. तेव्हा अशा या संकटात या रणमैदानात ‘राज्यसत्ता विरुध्द तुम्ही’च्या लढाईत तुमच्या बाजूने एक वकील आम्ही असतो तुमचा डिफेन्स म्हणुन, एक जबाबदार व्यक्ती म्हणून. तुम्ही चळवळीतील तुमची जबाबदारी पार पाडायची असते. गेली पंचवीस वर्षे मी ही जबाबदारी एक मानवाधिकार वकील/कार्यकर्ता म्हणून पार पाडत आलो. मी माझ्या पंचवीस वर्षाच्या वकीली कारकिर्दीत माझ्या पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे आणि दृढतेने कार्यरत राहीलो. राजकीय कैद्यांच्या केसेस ज्या माझ्या आयुष्यात प्रधान राहिल्यात, त्या केसेस मी लढत आलोय. ही माझी सामाजिक संवेदनशीलता होती, जी मला राजकीय बंद्यांच्या केसेसमध्ये त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचा वकील म्हणुन लढण्यास पाठबळ देत आलेली आहे. मात्र या एल्गार परिषद प्रकरणात मी स्वतःच मागील जवळपास तीन वर्षे तुरुंगात असल्याकारणाने तुला सोडविण्याच्या प्रयत्नात मी कमी पडलो, मला याचे खूप दुःख आहे. कांचन, मी स्वतः निश्चितपणे याची स्व-समीक्षा करेन. मी माझ्या संवेदनशीलतेला हा प्रश्न सतत विचारत राहील की तुला तुरुंगातून सोडवण्याच्या प्रयत्नात मी कुठे आणि का कमी पडलो? तुझं जाणं ही एक अपराधी भावना जखम म्हणून राहील माझ्या मनावर.
कांचन, जनचळवळीत तू खूप विचारपूर्वक आयुष्य झोकून दिलेस आणि शेवटपर्यंत ते फकिरी आयुष्य जगलीस. जात्यांध शासनाने जनतेवर लादलेल्या अन्याय अत्याचाराचा समूळ नायनाट करून समतेवर आधारीत जात-वर्गहीन समाज उभा करण्यासाठी तू कटिबद्ध होतीस आणि शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहीलीस. त्यामुळे मी हे निश्चितपणे म्हणू शकतो की न्याय्य हक्कासाठीच्या जनआंदोलनात, मोर्चात त्वेषाने उगारलेली तुझी एक मूठ शेवटचा श्वास घेतानाही तशीच उगारलेली असेल! सावित्रीबाई फुले, शहिद भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण इतिहास वाचतो आणि इतिहासातून असे वर्तमानात आपल्या चेतनेत साठवून घेतो, त्यांच्या क्रांतिकारी जीवनाला सलाम करतो, त्यांना आदर्श मानतो आणि त्यांच्यापासून त्यांच्या पाऊलखुणांवर चालण्याचा प्रयत्न करत राहतो. या परिप्रेक्षात पाहता या प्रवासात तू खूप सारी पावलं पुढे चालून गेलेली दिसून येतेस आणि मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की आता आम्ही तुझ्या या पाऊलखुणांवर चालू पाहतो. क्रांतिकारकांचा उदात्त इतिहास असा वर्तमानात जगताना दिसतोय मला तुझ्या रूपात. ही माझ्या भावनांची अतिशयोक्ती निश्चितच नाही कारण एक मानवी अधिकार वकील म्हणून गेल्या पंचवीस वर्षात मी जात-वर्ग-स्त्री दास्य अंताची चळवळ आणि या चळवळीचे निर्भीड आणि दृढ कार्यकर्ते पाहिले आहेत. या चळवळीतील तुझा प्रवास मी अनुभवला आहे. चंद्रपूर आणि येरवडा तुरुंगातील एक राजकीय बंदी म्हणूनचा तुझा संघर्ष मी ऐकला आहे, पाहिला आहे. चळवळ की घर असा प्रश्न तुझ्या परिवाराने उभा केला तेव्हा तू घरा-दाराचा त्याग करून चळवळीत आयुष्य झोकून दिलंस म्हणुन तुझ्या या क्रांतिकारी जिंदगीला आणि चिवट जीवनसंघर्षाला मी क्रांतिकारी जयभीम करतो. एक शोकसभेतील सोपस्कार म्हणून नव्हे तर अगदी मनापासून क्रांतिकारी जयभीम!
कांचन, तू तुरुंगाच्या बाहेर असतीस तर चांगले उपचार करून स्वतःला वाचवू शकली असतीस. अशा दुर्धर आजारपणात आवश्यकता असते ती घरच्या व जवळच्या प्रेमळ संवेदनशील माणसांची, जे मनापासून मदत करतील. आजारपणातून बरे होण्यासाठी अशी मदत तुला तुरुंगाच्या बाहेर मिळू शकली असती. मात्र आम्ही न्यायालयाला हे पटवून देण्यात अपयशी ठरलो कदाचित! आणि तुला सोडून दिलं तुरुंग प्रशासनाच्या मर्जीवर, ज्यांना कैदी आणि जनावर यातला फरक माहित नाही. कांचन, तुझं असं जाणं हे निश्चितच साधं नाहीय. तुझा मृत्यू हा एक नियोजनबद्ध असा संस्थात्मक खून (Institutional murder) आहे असे मी समजतो, एक न्यायाधीन बंदी म्हणून. न्यायाच्या आशेत तब्बल सात वर्षे येरवडा तुरुंगात खूपच कठीण परिस्थितीत काढलेले आहेत. या सात वर्षात सत्र न्यायालयाने व उच्च न्यायालयाने मेडिकल ग्राउंडवरील तुझ्या जामीन अर्जाला तारीख पे तारीख या खेळात अगदी ठरवून ताटकळत ठेवले गेले. तुला जामीन नाकारण्याला एक मोठं कारण म्हणजे भांडवली -ब्राह्मण्यवादी,जात्यांध व्यवस्थेत आणि शासन-प्रशासनाच्या या व्यवस्थेची असलेल्या हितसंबंधात दडलेले आहे. आज भाजप आणि संघाशी संबंधित गुन्हेगारांना व दंगलखोरांना अगदी सफाईदारपणे तुरुंगातून व खटल्यातून मुक्त करून मोकाट सोडले जाते, क्लिन चीट दिली जाते. काश्मीरमधील एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्यावर दहशतवादाशी संबंध असल्याच्या कारणास्तव टाकलेल्या केसमध्ये तीन ते चार महिन्यात जामीन दिला जातो. भाजपशी संबंधित असलेल्या एका संपादकाला फौजदारी खटल्यात अगदी काही दिवसातच जामीन मिळतो. भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी भिडेला अटकही होत नाही आणि एकबोटेला एका महिन्यात जामीन मिळतो. मात्र कांचन नन्नावरेला ती दुर्धर आजाराने ग्रस्त असूनही सात वर्षे जामीन मिळत नाही. तसेच एल्गार परिषद खटल्यातील बंदी वरवरा राव यांनाही जामीन मिळत नाही. या खटल्यातील बंद्यांना जवळपास तीन वर्षापासून तुरुंगात सडवले जाते. सीएए आणि एनआरसी या जनविरोधी कायद्याच्या विरोधात संवैधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुरुंगात सडवले जाते. जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष आहे, हे फौजदारी कायदेशास्त्राचे निर्विवाद मुलभूत तत्त्व आहे. आणि Bail is rule, jail is exeption हे न्यायालयाने उत्क्रांत केलेले तत्त्व आहे यात कुणाला तिळमात्रही शंका नसेल. परंतु न्यायदानाचे हे मूलभूत तत्त्व तुझ्या मदतीला धावून येऊ शकले नाही. कारण या तत्वांचा सोयीनुसार निवडक पध्दतीने वापर होत आहे. हे तत्व हमखास धावून येतात भाजप-संघाच्या बगलबच्च्यांना, हितसंबंधियांना न्याय मिळवून देण्यासाठी. न्यायालयातून सूट मिळवून देण्यासाठी भारतीय व्यवस्थेचे पक्षपाती स्वरूप सर्व देशांत दिसत आहे. तू सुध्दा याचीच बळी ठरलीस. त्यामुळे तुझा मृत्यू हा निश्चितच साधा नाहीये. तुझा मृत्यू म्हणजे या पक्षपाती व्यवस्थेच्या मुस्काटात हाणलेली सणसणीत चपराक आहे. एक अशी चपराक जी समस्त शोषितांबाबत सोयीनुसार बहिरी बनत चाललेल्या दलाल व पक्षपाती व्यवस्थेच्या कानात घुमत राहील. कांचन, शेवटी मी एवढेच म्हणेन की तू गेली आहेस देहाने! पण एक शहिद म्हणून तू जिवंत राहशील जग बदलण्यास निघालेल्या प्रत्येक काळजात एक अजेय क्रांतिकारी म्हणून. तुला क्रांतिकारी जयभीम!
तुझा मित्र,एक कार्यकर्ता/राजकीय बंदी
एडवोकेट सुरेंद्र गडलिंग
यु. टी. नं. MB 98,
सर्कल नं.2/5 तळोजा मधवर्ती कारागृह