रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन
मुंबई, दि. १ : स्वयंसेवी संस्था, शासकिय यंत्रणेतील सर्व घटक यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेऊन नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी व इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
डॉ. शिंगणे यांनी मुंबई व ठाणे येथील रक्तपेढीच्या प्रतिनिधी यांची तातडीने बैठक घेतली. बैठकीला मुंबई व ठाणे येथील 30 रक्तपेढ्यांचे प्रतिनिधी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या कालावधीत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी वेळोवेळी जनतेला रक्तदानासाठी आवाहन केल्यानंतर जनतेने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. आता अनलॉक काळात नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे रक्ताची मागणी वाढते आहे. तसेच थॅलेसेमिया, कॅन्सर रुग्णांसाठी सुद्धा नियमित रक्ताची गरज आहेच. यास्तव अनलॉकच्या कालावधीतही रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदात्यांनी पुढे येऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणे गरजेचे आहे.
डॉ. शिंगणे म्हणाले, राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रक्त उपलब्धततेसाठी कार्यआराखडा तयार करुन प्रयत्न करावेत. रक्तपेढ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. सर्व रक्तपेढ्यांच्या प्रतिनिधींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताची गरज भागविण्यात येईल, असेही डॉ.शिंगणे यांनी सांगितले.
रक्तपेढीचे प्रतिनिधी यांनी आपल्या अडीअडचणी बैठकीमध्ये मांडल्या. रक्तदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करुन रक्तसंकलन वाढविण्यात येईल, अशी ग्वाही प्रतिनिधींनी यावेळी दिली.