भंडाऱ्यात भ्रष्टाचाराचा ‘आसगाव’ पॅटर्न; समाज मंदिर दुरुस्तीच्या नावाखाली शासनाच्या तिजोरीवर डल्ला?
Summary
पवनी (भंडारा): एकीकडे शासनाकडून गावागावांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात असताना, दुसरीकडे याच निधीवर डल्ला मारण्याचे प्रकार समोर येत आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव ग्रामपंचायतीमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. समाज मंदिर दुरुस्तीच्या कामात लाखो रुपयांची […]
पवनी (भंडारा):
एकीकडे शासनाकडून गावागावांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात असताना, दुसरीकडे याच निधीवर डल्ला मारण्याचे प्रकार समोर येत आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव ग्रामपंचायतीमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. समाज मंदिर दुरुस्तीच्या कामात लाखो रुपयांची अफरातफर झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आल्याने खळबळ उडाली असून, येणारी ग्रामसभा आता ‘वादळी’ ठरणार असल्याचे निश्चित झाले आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आसगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या जुन्या समाज मंदिराची इमारत वाचनालयासाठी देण्यात आली होती. यासाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत (सन २०२४-२५) १ लाख ८६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष जागेवर काम न करताच किंवा नावापुरते काम दाखवून हा संपूर्ण निधी प्रभारी सरपंच महेश फुंडे आणि तत्कालीन सचिव हटवार यांनी लाटल्याचा आरोप दिनेश सावरबांधे यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमुळे हा महाघोटाळा चव्हाट्यावर आला आहे.
प्रशासकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
या गंभीर आरोपांनंतर संबंधित जबाबदार व्यक्तींनी आपल्या परीने स्पष्टीकरण दिले आहे, मात्र हे खुलासे अधिकच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहेत:
प्रभारी सरपंच महेश फुंडे: “आरोपणमध्ये तथ्य नाही. आम्ही इस्टिमेटनुसारच काम केले आहे. कामाची क्वालिटी आणि निधीचा वापर योग्य झाला आहे.”
इंजिनिअर परवते (पंचायत समिती, पवनी): “काम पूर्ण इस्टिमेटप्रमाणे झाले असून त्यानुसारच एमबी (Measurement Book) तयार केली आहे. कामाच्या प्रमाणातच निधीची उचल केली असून काही पेमेंट अजूनही थकीत आहे.”
सद्य सचिव उके: “हे प्रकरण माझ्या कार्यकाळातील नसून तत्कालीन सचिव हटवार यांच्या कार्यकाळातील आहे. त्यामुळे मला या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती नाही.”
ग्रामसभा होणार की रणांगण?
शासकीय निधीचा हा कथित ‘डल्ला’ आता ग्रामस्थांच्या जिव्हारी लागला आहे. समाज मंदिराच्या दुरुस्तीसाठी आलेला पैसा नक्की कोणाच्या खिशात गेला, याचे उत्तर शोधण्यासाठी आता ग्रामसभेत जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसरीकडे अधिकार्यांची ‘सर्व आलबेल’ असल्याची भूमिका, यामुळे हे प्रकरण आता उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीपर्यंत पोहोचणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बातमी संकलन:
गणेश सोनपिंपळे,
जिल्हा प्रतिनिधी, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
