लाखांदूर तालुक्यातील पांदन रस्त्यांना गती; आमदार नाना पटोले यांचा आढावा, कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश
Summary
लाखांदूर : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि पावसाळ्यातील चिखलमय अडचणींना पूर्णविराम मिळावा, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता योजनेचा आढावा आमदार नाना पटोले यांनी घेतला. लाखांदूर तहसील कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्यांनी प्रलंबित कामे तातडीने मार्गी […]
लाखांदूर : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि पावसाळ्यातील चिखलमय अडचणींना पूर्णविराम मिळावा, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता योजनेचा आढावा आमदार नाना पटोले यांनी घेतला. लाखांदूर तहसील कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्यांनी प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.
बैठकीत बोलताना आमदार पटोले म्हणाले, “बळीराजा सुखी तर जग सुखी. शेतकऱ्याला त्याच्या बांधापर्यंत पक्का रस्ता मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. या कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.”
रस्त्यांचे सक्षमीकरणावर भर
पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. पांदन रस्ते सुसज्ज झाल्यास ट्रॅक्टर, बैलगाड्या तसेच इतर वाहने सहजपणे शेतात पोहोचू शकतील. यामुळे शेतीमालाची वेळेत वाहतूक होऊन शेतकऱ्यांचा खर्च आणि श्रम वाचणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
अतिक्रमण हटविण्याचे निर्देश
महसूल व पंचायत समिती विभागांनी समन्वयाने काम करत पांदन रस्त्यांवरील बळजबरीची अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, असे स्पष्ट निर्देश आमदार पटोले यांनी दिले. रस्त्यांच्या अडथळ्यांमुळे विकासकामे रखडू नयेत, यावर त्यांनी भर दिला.
निधीचे नियोजन आणि समन्वय
योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) यांच्याशी संगम साधून जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. विविध गावांतील प्रलंबित प्रस्तावांना तांत्रिक मान्यता देण्याच्या प्रक्रियेवरही विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीस उपस्थित मान्यवर
या बैठकीस प्रभारी उपविभागीय अधिकारी निलेश कदम, तहसीलदार वैभव पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बडोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, वनपरिक्षेत्र अधिकारी चन्ने, लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, दिघोरी मोठी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी अनेक गावांतील पांदन रस्त्यांच्या प्रस्तावांना तांत्रिक मान्यता देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील शेतरस्ते लवकरच सुसाट धावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
