येऱगाव येथे भव्य विदर्भस्तरीय खुली खंजेरी भजन स्पर्धा
मूल (जि. चंद्रपूर) : संत परंपरेचा जागर जपण्यासाठी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथी व सर्व संत स्मृती दिनानिमित्त येऱगाव येथे भव्य विदर्भस्तरीय खुली खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आमंत्रण पत्रकानुसार ही स्पर्धा गुरुवार दि. १९ मार्च २०२६ ते शुक्रवार दि. २० मार्च २०२६ दरम्यान पार पडणार आहे.
invitation 2.pdf None
स्पर्धेचे आयोजन येऱगाव, ता. मूल, जि. चंद्रपूर येथे करण्यात आले असून कार्यक्रमस्थळ सौ. प्रेमिला काशिनाथ मडावी यांच्या राहते घरी निश्चित करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या धार्मिक-सांस्कृतिक सोहळ्यात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमात उद्घाटन, मार्गदर्शन, भजन स्पर्धा तसेच पारितोषिक वितरण असे विविध टप्पे असणार आहेत. विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून भजन मंडळांचा सहभाग अपेक्षित असून स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणाही करण्यात आली आहे.
आयोजकांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संत परंपरेचा वारसा जपणे, युवकांना अध्यात्माची जोड देणे आणि ग्रामीण भागातील भजन परंपरेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
