प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘वाढवण बंदर प्रकल्पा’ची उद्या पायाभरणी
- 76000 कोटी रुपयांचा प्रकल्प
- वाढवण हे देशातील सर्वात मोठे खोल पाण्यातील बंदर ठरणार
- भारताची सागरी जोडणी वाढणार, जागतिक व्यापार केंद्र म्हणून स्थान मजबूत होणार
नवी दिल्ली 29 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 30 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई आणि पालघरला भेट देणार आहेत. प्रधानमंत्री श्री.मोदी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024ला संबोधित करतील. त्यानंतर सिडको मैदान, पालघर येथे विविध विकासप्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे.
प्रधानमंत्री पालघरमध्ये
30 ऑगस्ट 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराची पायाभरणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च रु. 76,000 कोटी आहे. अति-मोठ्या मालवाहू जहाजांना सामावून घेऊन देशाच्या व्यापार आणि आर्थिक वाढीस चालना देणारे जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेले वाढवण बंदर हे भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असेल आणि आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गांना थेट संपर्क प्रस्थापित करेल, ज्यामुळे वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंदरात खोल बर्थ, कार्यक्षम माल हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असतील. या बंदरामुळे रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतील, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि या प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासात गती मिळेल यावर भर देण्यात येत आहे. वाढवण बंदर प्रकल्पात पर्यावरणीय परिणाम कमी करण्यावर आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करून शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यावरही भर देण्यात आला आहे. हे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर भारताची सागरी जोडणी वाढवेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत करेल.
देशभरातील या क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने 1560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यपालन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात पाच लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.
360 कोटी रुपयांचा खर्च राष्ट्रीय जहाज दळणवळण आणि सहाय्य प्रणालीचा आरंभही प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत किनारपट्टीवरील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यांत्रिक आणि मोटरयुक्त मासेमारी जहाजांवर टप्प्याटप्प्याने 1 लाख ट्रान्सपॉन्डर्स बसवले जातील. जहाज दळणवळण आणि सहाय्य प्रणाली हे इस्रोने विकसित केलेले स्वदेशी तंत्रज्ञान आहे. मच्छिमार समुद्रात असताना द्विमार्गी दळणवळण स्थापित करण्याबरोबरच हे तंत्रज्ञान बचावकार्यात मदत करेल तसेच मच्छिमारांची सुरक्षा सुनिश्चित करेल.
प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या अन्य उपक्रमांमध्ये मासेमारी बंदरे आणि एकात्मिक ॲक्वापार्कचा विकास, तसेच रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टम आणि बायोफ्लॉक यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब यांचा समावेश आहे. हे प्रकल्प अनेक राज्यांमध्ये राबवले जातील आणि मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी, व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्या लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांसाठी उपयुक्त ठरतील.
मत्स्य बंदरांचा विकास, सुधारणा आणि आधुनिकीकरण, मत्स्य लँडिंग केंद्रे आणि मत्स्य बाजारपेठेचे बांधकाम यासह महत्त्वाच्या मत्स्यव्यवसाय पायाभूत प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळे मासे आणि सागरी खाद्यपदार्थांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा आणि स्वच्छ परिस्थिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 च्या विशेष सत्राला प्रधानमंत्री श्री.मोदी संबोधित करणार आहेत. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्वर्जन्स कौन्सिल यांनी संयुक्तपणे जीईएफचे आयोजन केले आहे. भारत आणि इतर विविध देशांतील धोरणकर्ते, नियामक, वरिष्ठ बँकर्स, उद्योगपती आणि शिक्षणतज्ज्ञांसह सुमारे 800 वक्ते या परिषदेत 350 हून अधिक सत्रांना संबोधित करणार आहेत. यात फिनटेक क्षेत्रातील नवीन कल्पना देखील मांडण्यात येतील. जी. एफ. एफ. 2024 मध्ये अंतर्दृष्टी आणि उद्योगाची सखोल माहिती देणारे 20 हून अधिक अभ्यास अहवाल आणि श्वेतपत्रे प्रकाशित केली जातील, असे प्रधानमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
००००