चंद्रपूर हादरले! मोरवा येथील चिमुकलीवरील अत्याचाराच्या प्रयत्नाने संतापाची लाट; आ. सुधीर मुनगंटीवार आक्रमक
चंद्रपूर: मोरवा परिसरात घडलेल्या एका अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. अवघ्या पाच वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या या घटनेनंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहून ‘नराधमाला’ कठोर धडा शिकवण्याची मागणी केली आहे.
आ. मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी
”ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे,” अशा शब्दात आ. मुनगंटीवार यांनी आपला संताप व्यक्त केला. या नराधमाला पोस्को (POCSO) कायद्याच्या अंतर्गत कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तपासात कोणतीही दिरंगाई होऊ नये आणि दोषारोपपत्र तातडीने न्यायालयात दाखल करून पीडितेला त्वरित न्याय मिळावा, यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जलदगतीने व्हावा, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
महिला मोर्चाचा आक्रमक पवित्रा
आ. मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार, भाजपा महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांची भेट घेतली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनावर दबाव वाढवत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच पीडित बालिका व तिच्या कुटुंबाला तातडीने सुरक्षा पुरवण्याची मागणीही जोर धरत आहे.
बळीची मागणी: ‘नराधमाला दया दाखवू नका!’
या प्रकरणातील आरोपीला कायद्याचा धाक वाटावा, अशी कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.
तातडीने कारवाई: पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीची रवानगी कारागृहात करावी.
युद्धपातळीवर तपास: तपास पूर्ण करून जलदगतीने दोषारोपपत्र दाखल व्हावे.
कुटुंबाला संरक्षण: पीडित कुटुंबाला सुरक्षा आणि आवश्यक शासकीय मदत मिळावी.
मोरवा येथील या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता पोलिस प्रशासन या नराधमावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर
