मानवी हक्कांप्रती जागरूकता निर्माण करण्याची गरज – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर ‘बेसिक्स ऑफ ह्युमन राईटस्’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
अमरावती, दि. ६ : समाजात मानवी हक्कांप्रती जागरूकता आणणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अधिकाधिक साहित्य निर्माण झाले पाहिजे. मानवी हक्कांच्या मूलभूत तत्वांवर प्रकाश टाकणारे ‘बेसिक्स ऑफ ह्युमन राईटस्’ हे डॉ. वर्षा देशमुख यांचे पुस्तक अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.
डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापिका डॉ. वर्षा देशमुख यांनी लिहिलेल्या ‘बेसिक्स ऑफ ह्युमन राईटस्’ पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
‘बेसिक्स ऑफ ह्युमन राईटस्’ या पुस्तकात डॉ. वर्षा देशमुख यांनी मानवी हक्कांच्या तत्वांबाबत अत्यंत सुबोध भाषेत मांडणी केली आहे. विधी अभ्यासक्रम, राज्यशास्त्र व इतर पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच विविध क्षेत्रातील जाणकार, अभ्यासक व कार्यकर्ते यांच्यासाठीही ते उपयुक्त असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. भारतीय राज्यघटनेच्या तिस-या प्रकरणात मानवी हक्कांचा समावेश आहे, असे श्रीमती डॉ. देशमुख यांनी सांगितले.
शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, सचिव शेषराव खाडे, डॉ. सुधाताई देशमुख, डॉ. राजेंद्र गणेरीवाल, डॉ. अश्विन देशमुख, प्रेरणा इंगोले, डॉ. विजय चौबे, डॉ. अंजली ठाकरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.