संविधानाच्या रक्षणाची प्रतिज्ञा आणि हुतात्म्यांना सलाम! अर्जुनी/मोरच्या सरस्वती विद्यालयात ‘संविधान दिन’ देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला!
Summary
विद्यार्थ्यांची लक्षवेधी मानवी शृंखला आणि उद्देशिकेचे सामूहिक वाचन; लोकशाहीचा जागर करत २६/११ च्या शहिदांना भावपूर्ण आदरांजली अर्जुनी/मोर.: देशभक्तीचा जल्लोष, संविधानाच्या मूल्यांचा जागर आणि शहिदांच्या बलिदानाची जाणीव… अशा भारदस्त वातावरणात अर्जुनी/मोर येथील स्थानिक सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय संविधान दिन […]
विद्यार्थ्यांची लक्षवेधी मानवी शृंखला आणि उद्देशिकेचे सामूहिक वाचन; लोकशाहीचा जागर करत २६/११ च्या शहिदांना भावपूर्ण आदरांजली
अर्जुनी/मोर.:
देशभक्तीचा जल्लोष, संविधानाच्या मूल्यांचा जागर आणि शहिदांच्या बलिदानाची जाणीव… अशा भारदस्त वातावरणात अर्जुनी/मोर येथील स्थानिक सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
कार्यक्रमाचा ‘श्रीगणेशा’ झाला तो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे आणि संविधान पुस्तकाचे पूजन करून अभिवादन केल्याने. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य जे. डी. पठाण सर होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्या अर्चना गुरुनुले, पर्यवेक्षक शिवचरण राघोंते, वरिष्ठ शिक्षक कुंडलिक लोथे, प्रा. टोपेश बिसेन आणि मुख्याध्यापिका कल्पना भुते यांची लक्षणीय उपस्थिती होती.
कार्यक्रमात बोलताना प्राचार्य जे. डी. पठाण सर यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. “संविधानामुळेच आपल्या देशाची लोकशाही अधिक बळकट झाली आहे. प्रत्येक नागरिकाने एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनून आपली कर्तव्ये पार पाडली, तरच खऱ्या अर्थाने संविधानाचा उद्देश पूर्ण होईल,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
या सोहळ्यातील सर्वात भावूक आणि प्रेरणादायी क्षण ठरला तो म्हणजे, २६/११ या दिवशी भारतावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्मांना अर्पण करण्यात आलेली आदरांजली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून या शूरवीरांच्या बलिदानाला सलाम केला. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. तर, विद्यार्थ्यांनी आपल्या एकजुटीतून साकारलेली ‘संविधान दिनाची’ मानवी शृंखला उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन इयत्ता आठवीची विद्यार्थिनी जारा भुरा आणि प्रा. नयना हटवार यांनी केले. हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व प्राध्यापक वृंदांनी मोलाचे सहकार्य केले.
संकलन:- श्री गणेश सोनपिंपळे, जिल्हा प्रतिनिधी, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
