कष्टाचे धान चोरणारे चोरटे मोकाट, तर बळीराजाच्या नशिबी पोलीस ठाण्याचे उंबरठे! १६ दिवसांनंतरही दिघोरी पोलिसांचे हात रिकामेच; हतबल शेतकऱ्याची थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव!
चिकना शिवारातील धान चोरी प्रकरणाचा तपास थंड बस्त्यात; संतप्त बळीराजाची थेट पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची याचना, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी
लाखांदूर:
रात्रंदिवस काळ्या मातीत घाम गाळून पिकवलेले १० पोती धान चोरट्यांनी लंपास केले… बळीराजाने तातडीने खाकी वर्दीचे दार ठोठावले. मात्र, या घटनेला तब्बल १६ दिवस उलटूनही ना चोर सापडले, ना चोरीला गेलेला माल! दिघोरी पोलिसांच्या या संथ आणि सुस्त तपासामुळे संतापलेल्या व हतबल झालेल्या चिकना येथील शेतकऱ्याने अखेर १४ नोव्हेंबर २०२६ रोजी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या दरबारात धाव घेत न्यायाची याचना केली आहे.
चित्रपटातील एखाद्या हतबल नायकाप्रमाणे न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव सिताराम एकनाथ बोरकर (रा. चिकना) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी चिकना शेत शिवारातील त्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १० पोती धान लंपास केले होते. याप्रकरणी बोरकर यांनी तातडीने दिघोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, घटनेला १६ दिवस लोटूनही तपासाचे चक्र एक इंचही पुढे सरकलेले नाही. आरोपी अद्याप मोकाटच फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
एकीकडे अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी कष्टाने पिकवलेले धान चोरीला गेल्याने आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवूनही पदरी केवळ निराशाच येत असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिघोरी पोलिसांच्या या दिरंगाईविरोधात परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
अखेर स्थानिक पोलिसांकडून न्यायाची आशा मावळल्याने पीडित शेतकरी सिताराम बोरकर यांनी थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी आर्जव त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर, दिघोरी पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवत या चोरीचा छडा लावण्यासाठी तपास ‘आर्थिक गुन्हे शाखेकडे’ सोपवण्यात यावा, अशी ठाम मागणीही शेतकऱ्याने केली आहे. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर तरी खाकी वर्दी ‘ॲक्शन मोड’मध्ये येणार का आणि बळीराजाला न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
श्री गणेश सोनपिंपळे
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
