मुख्य गांधी चौकातील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध – ना. डॉ. अशोक उइके
Summary
आंबेडकरी जनतेच्या मागणीची दखल; जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न चंद्रपूर (पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क): शहरातील मुख्य गांधी चौक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा दरम्यान झालेली हिंसक घटना अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर कायदेशीर शिक्षा मिळवून […]
आंबेडकरी जनतेच्या मागणीची दखल; जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
चंद्रपूर (पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क):
शहरातील मुख्य गांधी चौक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा दरम्यान झालेली हिंसक घटना अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर कायदेशीर शिक्षा मिळवून देण्यासाठी आणि पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन चंद्रपूरचे पालकमंत्री ना. डॉ. अशोक उइके यांनी केले.
घटनेची पार्श्वभूमी:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी होत असताना, रात्री १२ वाजेच्या सुमारास काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी डी.जे. वर नाचण्यावरून वाद घातला. या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या रविकांत टेंभुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच अनिकेत गलबले हा युवक या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे आंबेडकरी चळवळीत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक:
या घटनेच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रवीण खोब्रागडे व देशक खोब्रागडे यांनी प्रशासनाला बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘वीस कलमी’ सभागृहात पालकमंत्री ना. डॉ. अशोक उइके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली.
या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वासुमाना पंत, मनपा आयुक्त अकनुरी नरेश, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्यासह मृत टेंभुरकर आणि जखमी गलबले कुटुंबाचे सदस्य उपस्थित होते.
प्रशासनाला कडक निर्देश:
बैठकीच्या सुरुवातीला प्रवीण खोब्रागडे यांनी आंबेडकरी समाजाच्या वतीने घटनेचा सविस्तर तपशील मांडला आणि मागण्यांचे निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी तातडीने दखल घेत पोलीस प्रशासनाला आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच, मृतकाच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घेण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
मान्यवरांची उपस्थिती:
यावेळी आंबेडकरी चळवळीतील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये अशोक फुलझेले, किशोर तेलतुंबडे, बंडू ठेंगरे, अशोक निमगडे, ॲड. राजस खोब्रागडे, प्रा. डॉ. टी.डी. कोसे, राजु कीर्तक, रूपेश वाळकोंडे, बुद्धप्रकाश वाघमारे, सुरेश नारनवरे, भाऊराव दुर्योधन, धर्मेश निकोसे, विशाल रंगारी, राजकुमार जवादे, सुरेंद्र रायपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
रिपोर्ट: मुख्य संपादक तथा डायरेक्टर, श्री राजकुमार खोब्रागडे, चंद्रपूर.
