भंडारा पोलिसांचा महाधडाका! चोवीस तासांत अवैध धंद्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त
Summary
एसपी नूरुल हसन यांच्या ‘स्पेशल ५०’ पॅटर्नचा जलवा; साकोली अन् तुमसरमध्ये लाखांचा मुद्देमाल जप्त! भंडारा (वृत्तसेवा): जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांच्या आता खैर नाही! पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी अवैध व्यवसायांविरुद्ध पुकारलेल्या युद्धाने जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. मागील २४ तासांत […]
एसपी नूरुल हसन यांच्या ‘स्पेशल ५०’ पॅटर्नचा जलवा; साकोली अन् तुमसरमध्ये लाखांचा मुद्देमाल जप्त!
भंडारा (वृत्तसेवा):
जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांच्या आता खैर नाही! पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी अवैध व्यवसायांविरुद्ध पुकारलेल्या युद्धाने जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. मागील २४ तासांत जिल्ह्याच्या विविध भागात सिनेस्टाईल धाडी टाकून पोलिसांनी २ लाख ४२ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. साकोली आणि तुमसरमध्ये झालेल्या या मोठ्या कारवाईने माफियांचे धाबे दणाणले आहेत.
🔥 साकोलीत ‘ऑपरेशन जांभळी सडक’: १.३५ लाखांचा साठा नष्ट!
साकोली पोलिसांनी सानगडी आणि जांभळी सडक परिसरात मोठी कारवाई केली. अनिकेत कल्लीकार, राजेंद्र चाचेरे, पुरुषोत्तम कल्लीकार आणि गोपाल रोकडे यांच्या अड्ड्यावर धाड टाकली असता, चक्क ४,२५० किलो सडवा मोहापास आणि दारू गाळण्याचे साहित्य मिळून आले. या एकाच कारवाईत १,३५,९०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वडद येथेही एका महिलेकडून ‘टायगर ब्रँड’ची दारू जप्त करण्यात आली.
⚡ तुमसरमध्ये १,०४० किलो सडवा जप्त!
तुमसर पोलिसांनी साखळी (मरार) परिसरात धाड टाकून दिनेश शहारे (३२) याला अटक केली. त्याच्याकडून तब्बल ५२ प्लास्टिक पोती भरून १,०४० किलो सडवा मोहाफास (किंमत १,०४,००० रुपये) जप्त केला. दुसऱ्या एका कारवाईत रविशंकर थोटे याला तुमसर शहरात हातभट्टीच्या दारूसाठ्यासह रंगेहात पकडले.
🎲 लाखनी आणि अड्याळमध्ये जुगार अड्ड्यांचा डाव उधळला!
लाखनी: केसलवाडा (वाघ) येथे ७० वर्षीय प्रेमराज रामटेके याला सट्टा चालवताना पकडले.
अड्याळ: रामदास कुंभारे (६०) याच्याकडून सट्टा साहित्य आणि नगदी रक्कम जप्त करण्यात आली.
खाकीची धडक: गुन्हेगारांना ‘नो एन्ट्री’!
पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व ठाणेदारांनी ही कारवाई केली आहे. लाखनी आणि अड्याळमध्ये जुगार अड्ड्यांवर तर तुमसर आणि साकोलीत दारू अड्ड्यांवर झालेल्या या धडक मोहिमेमुळे अवैध व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे.
”जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची पाळेमुळे खणून काढल्याशिवाय पोलीस स्वस्थ बसणार नाहीत.” – असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
वृत्तसंकलन:
अमर वासनिक
न्यूज एडिटर,
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
