मतदार यादी होणार ‘अपडेट’! काटोल-नरखेडमध्ये ‘SIR’ मोहिमेचा धडाका; सन २००२ मधील माहिती देण्याचे प्रशासनाचे आवाहन
Summary
मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी बीएलओ पोहचणार घराघरात; उपविभागीय अधिकारी पियूष चिंवडे यांची नागरिकांना महत्त्वाची सूचना. काटोल / कोंढाळी (प्रतिनिधी): निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी काटोल विधानसभा मतदारसंघ परिसरात ‘विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (SIR) – २०२५’ […]
मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी बीएलओ पोहचणार घराघरात; उपविभागीय अधिकारी पियूष चिंवडे यांची नागरिकांना महत्त्वाची सूचना.
काटोल / कोंढाळी (प्रतिनिधी):
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी काटोल विधानसभा मतदारसंघ परिसरात ‘विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (SIR) – २०२५’ अभियान युद्धपातळीवर राबविले जात आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यात येणार असून, नागरिकांनी आपल्या कुटुंबाची सन २००२ मधील माहिती तयार ठेवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
का आवश्यक आहे सन २००२ ची माहिती?
मतदार यादीतील जुन्या नोंदींची पडताळणी करणे आणि दुबार नावे किंवा स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करण्यासाठी सन २००२ चा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून माहिती संकलित करणार आहेत.
नागरिकांनी ही माहिती तयार ठेवावी:
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बीएलओ घरी आल्यावर खालील माहिती संकलित स्वरूपात उपलब्ध करून द्यावी:
१. आई-वडिलांचे पूर्ण नाव (सन २००२ च्या नोंदीनुसार).
२. सन २००२ मधील रहिवासी पत्ता (गाव, वॉर्डाचे नाव, तालुका आणि जिल्हा).
३. मतदारसंघाचा तपशील: विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदार संघ क्रमांक.
४. तांत्रिक माहिती: मतदार यादीतील भाग क्रमांक आणि अनुक्रमांक.
प्रशासनाचा इशारा आणि आवाहन
ही मोहीम केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास भविष्यात मतदानाच्या हक्कावर गदा येऊ शकते किंवा मतदार यादीत अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशारा निवडणूक विभागाने दिला आहे.
”मतदार यादी अचूक करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मोलाचे आहे. बीएलओ (BLO) घरी आल्यावर त्यांना योग्य आणि अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवावा.”
— पियूष चिंवडे, (निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, काटोल).
या मोहिमेमुळे काटोल-नरखेड परिसरातील मतदार यादी दोषमुक्त होण्यास मदत होणार असून, लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार आहे.
वृत्त संकलन: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com
