मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी खाकी आणि खादीचा पुढाकार! सरस्वती विद्यालयात ‘एच.पी.व्ही.’ लसीकरणाचा जागर; १७० विद्यार्थिनींची उपस्थिती
कर्करोगाला हरवण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र; डॉ. कवीश्वर किरसान यांनी मांडले परखड विचार!
अर्जुन मोर / भंडारा:
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, हा मंत्र जपत आणि किशोरवयीन मुलींना भविष्यातील महाभयंकर अशा ‘गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगा’पासून सुरक्षित ठेवण्यासाठी सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात एका विशेष मार्गदर्शन सोहळ्याचा ‘धडाका’ उडाला. १७ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात आरोग्य तज्ज्ञांनी पालकांच्या मनातील भीती दूर करत लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले.
तज्ज्ञांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’: कर्करोगाचा धोका होणार नष्ट!
प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंबी/टोला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कवीश्वर किरसान यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना विज्ञानाची ताकद विशद केली. “गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी १४ ते १५ वयोगटातील मुलींना एच.पी.व्ही. (HPV) लस देणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रमाणित केली असल्याचे सांगत त्यांनी अफवांना पूर्णविराम दिला.
पालकांचे शंका निरसन अन् डॉक्टरांचा सल्ला
लसीकरणाबाबत पालकांच्या मनात असलेल्या अनेक शंकांचे डॉक्टरांनी अत्यंत सोप्या भाषेत निरसन केले. यावेळी उपस्थित माता आणि पुरुष पालकांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचे स्वागत केले. सुरक्षित भविष्यासाठी ही लस एक ‘सुरक्षा कवच’ असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त करण्यात आले.
’आरोग्य हीच खरी संपत्ती’ – उपप्राचार्यांचे आवाहन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या उपप्राचार्या अर्चना गुरुनुले आणि प्रमुख अतिथी जी.एम.बी. विद्यालयाच्या प्राचार्या शव्या जैन यांनी पालकांना भावनिक साद घातली. “आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कर्करोगमुक्त पिढी घडवा,” असे आवाहन त्यांनी केले.
महिला शक्तीचा सहभाग
या कार्यक्रमाचे यशस्वी संचालन आणि आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका वर्षा गायधने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. पंधरा वर्षांखालील जवळपास १७० विद्यार्थिनींची उपस्थिती या कार्यक्रमाचे यश अधोरेखित करत होती.
वृत्त संकलन: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com
