भंडारा पोलिसांचा ‘धडाका’! एसपी नूरुल हसन यांच्या आदेशाने अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले लाखांदूर, कारधा, तुमसर, आंधळगाव अन् साकोलीत एकाच वेळी धाडी; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त!
Summary
भंडारा (प्रतिनिधी): जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध आता खाकी वर्दीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी अवैध धंदे मुळासकट उखडून टाकण्याचे थेट आदेश दिल्यानंतर, भंडारा पोलिसांनी जिल्ह्याच्या विविध भागात ‘सिनेस्टाईल’ धाडी टाकून जुगार आणि दारू माफियांना जोरदार […]
भंडारा (प्रतिनिधी):
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध आता खाकी वर्दीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी अवैध धंदे मुळासकट उखडून टाकण्याचे थेट आदेश दिल्यानंतर, भंडारा पोलिसांनी जिल्ह्याच्या विविध भागात ‘सिनेस्टाईल’ धाडी टाकून जुगार आणि दारू माफियांना जोरदार झटका दिला आहे. एकाच दिवशी पाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ६३,८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
💥 कुठे आणि कशी झाली कारवाई?
१. लाखांदूरमध्ये जुगाराचा डाव उधळला!
लाखांदूर पोलिसांनी खैरी परिसरात धाड टाकून देवदत्त हरीदास बन्सोड (३८) याला सट्टापट्टी चालवताना रंगेहात पकडले. त्याच्याकडून नगदी रक्कम आणि सट्टा साहित्यासह १,२१५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
२. कारध्यात ६० वर्षीय महिलेवर कारवाई
कारधा पोलिसांनी आमगाव (टोली) परिसरात छापा मारला असता, ६० वर्षीय श्रीमती प्रतिमा उके यांच्याकडे १० लिटर हातभट्टीची दारू मिळून आली. पोलिसांनी २,००० रुपयांची दारू जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
३. तुमसरमध्ये २४ हजारांचा ‘मोहाफास’ जप्त
तुमसर पोलिसांनी साखळी परिसरात मोठी कारवाई करत दिनेश लक्ष्मण शहारे (३६) याला पकडले. त्याच्याकडून तब्बल १२० किलो सडवा मोहाफास (किंमत २४,००० रुपये) जप्त करण्यात आला आहे. यामुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
४. आंधळगावात फिल्मी थरार; आरोपी फरार, मोटारसायकल जप्त
आंधळगाव पोलिसांनी धुसाळा शिवारात धाड टाकली असता, दिनेश वाटकर याला अटक करण्यात आली, तर त्याचा साथीदार ताम्रभोज वनवे हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला. पोलिसांनी ३५,००० रुपयांची मोटारसायकल आणि देशी दारू असा एकूण ३५,६६० रुपयांचा माल जप्त केला आहे.
५. साकोलीत ‘टायगर ब्रँड’वर पोलिसांचा पंजा
साकोली पोलिसांनी वडद परिसरात कारवाई करून राकेश कैलास गोडसेलवार याच्याकडून ‘टायगर ब्रँड’ देशी दारूचे २४ टिल्लू जप्त केले.
खाकीचा इशारा: अवैध धंदे चालवाल, तर गाठ पोलिसांशी!
पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांनी ही मोहीम राबवली आहे. जुगार अड्ड्यांवर १,२१५ रुपये तर दारू अड्ड्यांवर ६२,६२० रुपयांची कारवाई करण्यात आली आहे. “जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत,” असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलीस प्रशासनाने दिला आहे.
संकलन:-
अमर वासनिक
न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
