फेडेक्स कार्गो हबमुळे महाराष्ट्रातील व्यापाराला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भूमिपूजन
Summary
नवी मुंबई, दि. १८ (विमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असून, या सुविधेमुळे राज्यातील उद्योग, निर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री […]
नवी मुंबई, दि. १८ (विमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असून, या सुविधेमुळे राज्यातील उद्योग, निर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत फेडेक्सने मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हा भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचे महत्त्वपूर्ण प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष विजय सिंघल, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि. चे संचालक जीत अदानी, फेडेक्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम, फेडेक्स एमईआयएसच्या अध्यक्षा कामी विश्वनाथन, रिचर्ड स्मिथ, अरुण बंसल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फेडेक्सची जागतिक स्तरावरील मजबूत उपस्थिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रातील कार्गो हाताळणी आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात भारतातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक व्यग्र प्रवासी व कार्गो विमानतळ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उद्योग, निर्यात आणि संपूर्ण व्यावसायिक परिसंस्थेला मोठा फायदा होईल

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हा भारताच्या भविष्यातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असून 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देईल. पुरवठा व्यवस्थापन खर्च कमी करणे देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असून फेडेक्ससारख्या कंपन्यांमुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा खर्च कमी होण्यास मदत होईल. महाराष्ट्र हा देशाच्या उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असून फेडेक्सच्या सुविधेमुळे उद्योग, निर्यात आणि संपूर्ण व्यावसायिक परिसंस्थेला मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रास्ताविक भाषणात अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि.चे संचालक जीत अदानी म्हणाले की, फेडेक्सने नवी मुंबईची केंद्र म्हणून केलेली निवड ही महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचे प्रतीक आहे. विमानतळाचे जवाहरलाल नेहरू बंदर जवळील धोरणात्मक ठिकाण आणि अत्याधुनिक कार्गो सुविधा यामुळे हे हब जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरेल. या प्रकल्पामुळे निर्यातदार, लघु-मध्यम उद्योग, औषध व कृषी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी थेट जोडणी मिळेल. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.
फेडेक्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या पूर्णपणे स्वयंचलित आणि अत्याधुनिक एअर कार्गो हबचे भूमीपूजन हा भारताच्या जागतिक व्यापार जोडणीतील महत्त्वाचा टप्पा आहे. फेडेक्सचा हा भारतातील पहिलाच हब असून, ३ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासह उभारला जाणार आहे. फेडेक्सकडून या प्रकल्पात २५० दशलक्ष अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक दीर्घकालीन गुंतवणूक करण्यात येत असून, भारताच्या वाढत्या आर्थिक क्षमतेवरील विश्वासाचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
हा प्रकल्प भारताच्या राष्ट्रीय पुरवठा व्यवस्थापन खर्च धोरण आणि पीएम गतिशक्ती योजना उपक्रमाशी सुसंगत असून देशाची पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षमता वाढविण्यास मदत करेल. फेडेक्सचे नेटवर्क सुमारे २२० देशांमध्ये कार्यरत असून, नवी मुंबई हबमुळे भारत जागतिक पुरवठा साखळीत अधिक प्रभावीपणे सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
असे आहे एअर कार्गो हब
फेडेक्सतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ३ लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे अत्याधुनिक, पूर्णपणे स्वयंचलित एअर कार्गो हब उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी फेडेक्सकडून सुमारे २ हजार ५०० कोटीं रुपयांची दीर्घकालीन गुंतवणूक करण्यात येणार असून, हा हब भारतासाठी प्रादेशिक पुरवठा व्यवस्थान खर्चाचे केंद्र म्हणून विकसित होणार आहे. या सुविधेमुळे भारताचे दक्षिण-पूर्व आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिका या प्रमुख जागतिक बाजारपेठांशी थेट व्यापार संपर्क अधिक मजबूत होणार आहे. हा कार्गो हब पुरवठा व्यवस्थान खर्च, वेअरहाऊसिंग, वाहतूक आणि संबंधित क्षेत्रांमध्ये ६ हजार हून अधिक थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करेल. अत्याधुनिक स्वयंचलित सॉर्टिंग सिस्टीम, डायमेन्शनल स्कॅनिंग, हाय-स्पीड स्क्रीनिंग तंत्रज्ञान आणि समर्पित विमान पार्किंग सुविधांमुळे इनबाउंड व आऊटबाउंड शिपमेंटची एकाचवेळी प्रक्रिया शक्य होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी उत्पादने, औषधनिर्मिती आणि नाशवंत वस्तूंसारख्या उच्च-मूल्य व वेळेवर आधारित क्षेत्रांना अधिक विश्वासार्ह आणि जलद सेवा मिळणार आहे. या सुविधेमुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना निर्यात-आयात क्षमतेत वाढ होऊन पुरवठा व्यवस्थान खर्च कमी होण्यास मदत होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील कार्गो क्षमता प्रारंभी सुमारे ०.५ दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक राहणार असून, पुढील टप्प्यांत ती सुमारे ३.२५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
०००
