शासकीय जमिनीवर अतिक्रमण: कनेरीच्या उपसरपंचाचे सदस्यत्व रद्द
Summary
गडचिरोली, चक्रधर मेश्राम विभागीय प्रतिनिधी ता.१३:- शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन पत्नीच्या नावाने घर बांधणाऱ्या गडचिरोली तालुक्यातील कनेरी येथील ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. प्रभाकर विष्णूजी लाकडे असे अपात्र केलेल्या सदस्याचे नाव असून, ते उपसरपंच होते. जानेवारी २०२१ मध्ये […]
गडचिरोली, चक्रधर मेश्राम विभागीय प्रतिनिधी ता.१३:-
शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन पत्नीच्या नावाने घर बांधणाऱ्या गडचिरोली तालुक्यातील कनेरी येथील ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. प्रभाकर विष्णूजी लाकडे असे अपात्र केलेल्या सदस्याचे नाव असून, ते उपसरपंच होते.
जानेवारी २०२१ मध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात प्रभाकर लाकडे हे कनेरी येथील प्रभाग क्रमांक ३ मधून निवडून आले. बहुमत असल्याने पुढे ते उपसरपंचही झाले. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य अजय संजय गेडाम यांनी प्रभाकर लाकडे यांनी आपल्या पत्नीच्या नावाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन घर बांधल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी करणारी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावर सुनावणी होऊन १२ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केला. त्यानुसार प्रभाकर लाकडे यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.
म्हणे पत्नीपासून विभक्त राहतो.. ?
अजय गेडाम यांनी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गैरअर्जदार प्रभाकर लाकडे यांना लेखी उत्तर देण्यास सांगितले. त्यात लाकडे यांनी अजबच माहिती दिली. ‘मी १९८४ पासून जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षक होतो. ऑगस्ट २०१९ मध्ये सेवानिवृत्त झालो. त्यानंतर मी कनेरी येथील वडिलोपार्जित घरी वास्तव्यास आलो. माझ्या पत्नीने आपल्या माहेरच्या लोकांकडून प्राप्त रकमेच्या बळावर भूमापन क्रमांक ४३ वर घर बांधले. परंतु १९९५-९६ पासून माझी पत्नी माझ्यापासून विभक्त राहत आहे व मी पत्नीसोबत अतिक्रमित जागेवर बांधलेल्या घरात कधीही वास्तव्यास नव्हतो’, त्यामुळे माझे सदस्यत्व कायम ठेवावे, असा अजबच युक्तिवाद लाकडे यांनी केला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी व तलाठ्याकडून अहवाल मागितला. दोघांच्या संयुक्त अहवालानुसार, तसेच तहसीलदारांच्या अहवालानुसार, प्रभाकर लाकडे हे आपल्या पत्नीसह अतिक्रमण केलेल्या जागेवर एकत्रित राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभाकर लाकडे यांचे सदस्यत्व रद्द केले. पद वाचविण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कूलचा मुख्याध्यापक राहिलेल्या एका व्यक्तीने चक्क पत्नीपासून विभक्त राहत असल्याचे खोटे कारण सांगितल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे.
………………