मोहाडीत अवैध रेती तस्करांवर महसूल विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ३० लाखांचा ट्रकसह मुद्देमाल जप्त
मोहाडी (भंडारा):
अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर मोहाडी महसूल विभागाने धडक कारवाई करत तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आज पहाटेच्या सुमारास सुकळी (दे) परिसरात विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा एक हाय-प्रोफाईल ट्रक महसूल पथकाने सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून पकडला. या कारवाईत रेतीसह तब्बल ३० लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चालक आणि मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
दिनांक २६ मार्च २०२६ रोजी पहाटे ६:५० च्या सुमारास, मौजा सुकळी (दे) परिसरात एक ट्रक (क्रमांक MH-40-BL-1010) संशयास्पद रित्या रेतीची वाहतूक करत असल्याचे महसूल विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आले. महसूल मंडळ अधिकारी (माडगी) श्री. विलास मुरलीधर धावले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ या ट्रकची तपासणी केली असता, त्यात ६ ब्रास रेती विनापरवाना अवैधपणे भरलेली असल्याचे निष्पन्न झाले.
कारवाई आणि गुन्ह्याची नोंद
या अवैध वाहतुकीप्रकरणी महसूल विभागाने ट्रक आणि रेती असा एकूण ३० लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तहसीलदार, तुमसर यांच्या आदेशानुसार, श्री. विलास धावले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्यावर झाली कारवाई:
१. प्रशांत देवचंद आगाशे (वय ३०, रा. मोहाडी) – ट्रक मालक
२. श्रेयस गणेश गायधने (वय २५, रा. कुशारी) – ट्रक चालक
पोलिसांची भूमिका
आरोपींविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २०८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३०३(२), ४९ आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ (७), (८) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दुर्याेधन भुरे (मो. ९४०३३५५३५१) करत आहेत.
महसूल विभागाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
