मुंबईत २८ ऑगस्टला रानभाज्या, कृषिमाल विक्री महोत्सव – मुंबईत मुलुंडमध्ये प्रथमच आयोजन
Summary
ठाणे, दि. 24 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ या मोहिमेंतर्गत ‘उत्पादक ते थेट ग्राहक’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘रानभाज्या’ महोत्सव राज्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विद्यमाने मुंबईत प्रथमच मुलुंड येथे २८ […]
ठाणे, दि. 24 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ या मोहिमेंतर्गत ‘उत्पादक ते थेट ग्राहक’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘रानभाज्या’ महोत्सव राज्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विद्यमाने मुंबईत प्रथमच मुलुंड येथे २८ ऑगस्ट २०२१ रोजी रानभाज्या व कृषि माल महोत्सव व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.
पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध भाज्यांची लज्जत सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्या भाज्यांवर उपजीविका असलेल्या आदिवासी बांधव व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेले भाजीपाला अन्नधान्य तसेच कृषि प्रक्रिया केलेली उत्पादने यांच्या विक्रीसाठी तसेच मुलुंडमधील सर्वच नागरिकांना या उपक्रमाचा लाभ व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. रानभाज्यांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या, फळभाज्या, फुलभाज्या या भाज्या पावसाळ्यात येतात व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे याकरिता ठाणे, पालघर, रायगड व नाशिक जिल्ह्यातून विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत शेतकरी ग्राहक थेट संकल्पनेवर आधारीत कार्यक्रम राबविण्यासाठी मुलुंड मधील विविध गृहनिर्माण सोसायट्या गटांना जोडून देऊन माहे सप्टेंबर-ऑक्टोबरपासून भाजीपाला व कृषि उत्पादने विक्री करण्याचे नियोजन आहे. मुलुंड हायस्कूल हॉल, आन्ध्र बँकेच्या जवळ, चंदन बाग रोड, पाच रस्ता, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८० येथे दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत रानभाज्या व कृषि माल महोत्सव व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त सोसायट्यांनी तसेच ग्राहकांनी प्रदर्शन व विक्रीस भेट द्यावी, असे आवाहन ठाण्याचे जिल्हा अधीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.