मदत पुनर्वसनासोबत पूर प्रतिबंधक उपाययोजना राबविणार – पालकमंत्री बच्चू कडू
Summary
अकोला,दि.२९(जिमाका)- जिल्ह्यात तसेच राज्यात पूरस्थिती निर्माण झाली.त्यामुळे लोकांचे नुकसान झाले. या सर्व लोकांना मदत व पुनर्वसन करण्यासोबत आता पूर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती […]
अकोला,दि.२९(जिमाका)- जिल्ह्यात तसेच राज्यात पूरस्थिती निर्माण झाली.त्यामुळे लोकांचे नुकसान झाले. या सर्व लोकांना मदत व पुनर्वसन करण्यासोबत आता पूर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज आसेगाव बाजार ता.अकोट येथे केले.
आसेगाव बाजार येथे आज ना.कडू यांच्या हस्ते पुरबाधितांना अन्नधान्य किटचे तसेच सानुग्रह अनुदान मदत धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच निलेश ताडे, जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर, पंचायत समिती सभापती लताबाई नितोने, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, तहसीलदार निलेश मडके, गट विकास अधिकारी किशोर शिंदे तसेच अन्य अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
सानुग्रह अनुदान वाटपास अकोल्यात सर्वात आधी सुरुवात
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना ना.कडू म्हणाले की, गावात पुरामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी नाला खोलीकरण, पूर संरक्षक भिंत बांधकाम यासारखी कामे करण्यावर भर दिला जाईल. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अन्नधान्य किट वाटप करण्याचा एक चांगला उपक्रम आपण राबविला. हा बहुदा राज्यातील पहिलाच प्रयत्न आहे. तसेच राज्यात अकोला जिल्ह्यात सानुग्रह मदत वाटपासाठी सर्वात आधी सुरुवात झाली, असा उल्लेखही ना.कडू यांनी केला. नुकसानीचा पंचनामा करून पंचनाम्याची प्रत नुकसान ग्रस्त कुटुंबाला दोन दिवसात द्यावी,असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.