पूरग्रस्त भागातील विद्युत यंत्रणेच्या विकासकामांचा आराखडा तयार करा – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देश
Summary
सांगली, दि.30: पूरग्रस्त भागातील पूर पाण्याची पातळी लक्षात घेऊन विद्युत यंत्रणेची उंची वाढविण्यासाठी आराखडा तयार करा, शक्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने करा, असे निर्देश डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन […]
सांगली, दि.30: पूरग्रस्त भागातील पूर पाण्याची पातळी लक्षात घेऊन विद्युत यंत्रणेची उंची वाढविण्यासाठी आराखडा तयार करा, शक्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने करा, असे निर्देश डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी हे आदेश दिले आहेत.
या दौऱ्यात त्यांनी पूरग्रस्त पलूस, वाळवा तालुक्यासह सांगली शहरात पाहणी केली. पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या महावितरणच्या दुधगाव, कवठेपिरान, शेरीनाला येथील 33/11 केव्ही उपकेंद्राची पाहणी केली.त्यांच्या समवेत या दौऱ्यात सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापुरामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील मिरज, शिराळा, वाळवा, पलूस या तालुक्याच्या भागात मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. स्थानिक जनतेच्या घराघरांमध्ये पाणी शिरले. पूरग्रस्त परिसरामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत उपकेंद्र, वीज वाहिन्या व रोहित्र यांचे प्राथमिक अंदाजानुसार 34 कोटी 68 लाख इतके नुकसान झाल्याची माहिती डॉ.राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सांगली शहराचा वीजपुरवठा दोन दिवसात सुरळीत करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील 17 उपकेंद्रात पाणी शिरल्याने बाधित झालेली सर्व उपकेंद्रे पूर्ववत करण्यात आली आहेत. पूर पूर्व नियोजन केले असल्याने उपकेंद्रे पाण्यात जाऊनही वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात महवितरणला यश आले, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. पर्यायी विद्युत वाहिनीवरून वीज पुरवठा घेऊन बहुतांश भाग सुरू करण्यात आला. शहरातील कोविड केंद्रे व ऑक्सिजन प्रकल्पाचा वीजपुरवठा बाधित होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. लोकांची पाण्याची गैरसोय दूर होण्यासाठी पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य दिले गेले.
29 जुलैपर्यंत एकूण बाधित घरगुती, वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीत 67628 ग्राहकांपैकी 65734 वीजग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. उर्वरित वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुख्य कार्यालय व प्रादेशिक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्तरावर दुरुस्ती कार्य सुरू आहे. लवकरच सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.
यापूर्वीदेखील 2019 मध्ये महापुराचा सांगली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यावेळी 12 ते 15 दिवसात दुरूस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. या पूर्वानुभवाचा व प्रभावी नियोजनामुळे यावेळी 5 दिवसात पूरबाधितांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणतला यश आले आहे. या कामगिरीबद्दल महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ऊर्जामंत्री राऊत यांनी विशेष कौतुक केले.पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी कोल्हापूर मुक्कामी राहून सुरळीत वीजपुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
राज्यातील पूरस्थितीचा विचार करता, मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील 1942 गावे व शहरातील 9 लाख 60 हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पूरात 7 लाख 87 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. रात्रंदिवस युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे सुरू असून लवकरच उर्वरित भागाचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण 1709 गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. 14 हजार 737 रोहित्रे बंद पडली असताना 12 हजार 46 रोहित्रे सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या 489 वीज वाहिन्यांपैकी आता 411 वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत. बंद पडलेल्या 67 वीज उपकेंद्रे व स्वीचिंग केंद्रापैकी 61 केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक उपकेंद्र आता चालू झालेला आहे.
सांगली दौऱ्यावर असताना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी येथे स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर पलूस तालुक्यातील बुर्ली, आमनापूर, अंकलखोप येथे भेटी देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली. पूरग्रस्त कुटुंबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. त्यानंतर वाळवा तालुक्यातील पुराचे पाणी शिरलेल्या दुधगाव व कवठे पिरान या दोन उपकेंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी आ. मोहनराव कदम, आ. अरुण लाड, महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोलप, सांगलीचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, महापारेषणच्या अधिक्षक अभियंता शिल्पा कुंभार या अधिकाऱ्यांसह पृथ्वीराज पाटील, महावितरण आणि महापारेषणचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, संबंधित गावांचे सरपंच आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांनी केला महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार
बुर्ली ग्रामस्थांच्या वतीने पूर काळात सुरळीत वीजपुरवठा दिल्याबद्दल महावितरण कर्मचाऱ्यांचा ऊर्जामंत्री राऊत यांच्या हस्ते सत्कार केला. बुर्ली ग्रामस्थांनी या भागातील पुराने नुकसान झालेल्या महावितरणच्या वीज खांबाची उभारणी करावी तसेच या गावाच्या परिसरात नव्याने वसलेल्या वस्त्यांकरिता वीज पुरवठ्याची मागणी केली. याप्रसंगी ऊर्जामंत्री राऊत यांनी, हिंमतीने व जीव ओतून 24 तास वीजपुरवठा सुरू राहील याची खबरदारी घेतल्याबद्दल वीज कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. पूरग्रस्त बुर्ली ग्रामस्थांच्या मागण्याबाबत सकारात्मक असून सर्वतोपरी मदत करू असे आश्वस्त केले. सदर दौऱ्यात अंकलखोप येथे पूरग्रस्त भागातील सरपंचांची बैठक घेऊन चर्चा केली.