नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार कोरोना योद्ध्यांच्या वारसास 50 लाख रुपयांचा धनादेश वाटप
नागपूर दि. 01 : सध्या देशात कोविड संसर्गाची दुसरी लाट आली असून, या नव्या प्रकारामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी भीती न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यविकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात त्यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांच्या वारसास 50 लाख रकमेचा धनादेश वितरण करण्यात आला. त्यावेळी श्री.केदार बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, आमदार समीर मेघे, सभापती तापेश्वर वैद्य, नेमावली माटे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार आदी उपस्थित होते.
कोविड काळात काम करताना डिगडोह (देवी) येथील सफाई कर्मचारी रोशन भिमराव पाटील यांना कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावताना संसर्ग झाल्यामुळे वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या आई श्रीमती लताताई भिमराव पाटील यांना आज श्री.केदार यांच्या हस्ते 50 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्राम विकास विभागाने या रकमेचा धनादेश सुपूर्द केला.
कोरोना संकटावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, आजपासून 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात कन्हान आणि काटोल येथे तर महानगरपालिका क्षेत्रात तीन अशी एकूण पाच लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. नागरिकांनी ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करावी. त्यानंतर न घाबरता लसीकरण करुन घ्यावे. तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी आपापल्या मतदारसंघातील लस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या यशकथा समाजमाध्यमांवरुन प्रसारित करुन जनजागृती करण्याचे त्यांनी आवाहन केले. श्री.भुयार यांनी आभार मानले.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491