डॉ. आशिष देशमुख यांनी कोविडग्रस्तांसाठी केली अतिरिक्त ३८ बेड्सची व्यवस्था
Summary
काटोल-दुर्गाप्रसाद पांडे व्हीएसपीएम अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन, नागपूरचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. आशिष देशमुख यांचा ८ एप्रिलला संस्थेअंतर्गत कार्यरत एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर यांच्यावतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. आशिष देशमुख यांनी […]
काटोल-दुर्गाप्रसाद पांडे
व्हीएसपीएम अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन, नागपूरचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. आशिष देशमुख यांचा ८ एप्रिलला संस्थेअंतर्गत कार्यरत एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर यांच्यावतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. आशिष देशमुख यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर येथे अतिरिक्त ३८ बेड्स उपलब्ध करून दिले आहेत. या नवीन कोविड वार्डचा शुभारंभ आज त्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
“लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर येथील ऑक्सिजन व इतर सुविधांनी सुसज्जित जवळपास २०० बेड्स कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी मागील वर्षापासूनच राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यात २० अत्याधुनिक आयसीयु बेड्सचा समावेश आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची गरज पाहता सर्व सुविधांनी सुसज्जित आणखी ३८ नवीन बेड्स रुग्णांसाठी उपलब्ध करून देत आहे. आता रुग्णालयात कोविडग्रस्त रुग्णांसाठी जवळपास २४० बेड्स रुग्णांच्या सेवेत कार्यरत असून सर्व डॉक्टर्स, नर्सेस, अटेंडन्ट व इतर कर्मचारी या कठीण परिस्थितीत आपल्या अमूल्य सेवा रुग्णांना हिमतीने प्रदान करीत आहेत. कोविडग्रस्त रुग्णांना भरती करून उपचाराची विशेष व्यवस्था करण्यात आल्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळत आहे. या सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा. आपण नेहमीच शासनाला वैद्यकीय सेवेसाठी सर्वतोपरी मदत करू”, असे प्रतिपादन डॉ. आशिष देशमुख यांनी यावेळी केले.
डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते केक कापून सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिया. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. सुधीर देशमुख, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा, लता मंगेशकर हॉस्पीटलचे प्रशासकीय संचालक डॉ. विकास धानोरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवस्थळे, उप-अधिष्ठाता डॉ. विलास ठोंबरे, व्हीएसपीएम दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. उषा रडके, डॉ. मनीषा देशपांडे, सर्व विभाग प्रमुख व इतर कर्मचारी उपस्थिती होते.
*डॉ. आशिष देशमुख यांच्यातर्फे कोविडग्रस्तांसाठी केलेले उल्लेखनीय कार्य:-*
* डॉ. आशिष देशमुख यांच्या पुढाकाराने एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी २०२० मध्ये शासनाला कोविड-१९ साठी ८१.३१ लाख रुपयांची स्वेच्छेने मदत केली होती.
* गरजूंना २५,००० पेक्षा जास्त मास्क व मोठ्या प्रमाणात किराणा/धान्य वाटप केले.
* मागील वर्षापासून उद्भवलेल्या या जीवघेण्या कोरोनामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खराब झाली. वैद्यकीय उपचारासाठी लोकांचे हाल होऊ नये म्हणून लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूरच्या माध्यमातून त्यांनी विविध गावांमध्ये अनेक रोगनिदान शिबिरे घेतली. रुग्णांना ने-आण करण्यासाठी नि:शुल्क वाहनांची व्यवस्था केली. शिबिरांतर्गत, रुग्णालयाच्या सर्वच ओपीडीमध्ये रुग्णांची नि:शुल्क तपासणी, जनरल वार्डमध्ये भरती रुग्णांचा १००% नि:शुल्क उपचार व ऑपरेशन करण्यात आले. गरजू रुग्णांसाठी ही ‘नि:शुल्क उपचार सेवा’ अजूनही सुरु आहे.
* कोव्हीड-१९ या जागतिक महामारीमुळे प्राथमिक शाळा बंद असून त्या कधी सुरु होतील याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात खंड पडला असून ही अतिशय चिंतेची बाब आहे. याचा प्रभाव मुलांच्या फ़क़्त आरोग्यापुरताच मर्यादित नसून त्यांचे भावी जीवन, शिक्षण, त्यांची सुरक्षितता आणि आर्थिक स्थिती यावरही होत आहे. या अनुषंगाने, शांतीलाल मुथ्था फाउंडेशनच्या सहकार्याने डॉ. आशिष देशमुख यांनी ‘सहयोगी शिक्षण अभियानाचा’ शुभारंभ दि. ०३ फेब्रुवारी २०२१ ला काटोल येथे उत्साहात केला. सहयोगी शिक्षण अभियानांतर्गत मूल्यशिक्षणाच्या बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक पैलूंच्या आधारे काटोल व नरखेड तालुक्यातील जवळपास ९००० प्राथमिक विद्यार्थ्यांना घडविण्याचा डॉ. आशिष देशमुख यांचा मानस आहे. सहयोगी शिक्षण अभियान प्राथमिक शिक्षणाच्या दृष्टीने क्रांतिकारक असून सहयोगी शिक्षण अभियानाच्या माध्यमातून काटोल व नरखेड या दोन्ही तालुक्यातील जि.प./न.प. प्राथमिक शाळांमधील प्रशिक्षित शिक्षक/शिक्षिका तसेच स्वयंप्रेरणेने समोर आलेल्या ३०९ लोकांच्या (शिक्षण सारथी) शिकवणीतून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडेल, असा त्यांना विश्वास आहे.
* काटोल व नरखेड तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा लाभ घ्यावा म्हणून गावागावातील नागरिकांना विविध लसीकरण केंद्रांवर ने-आण करण्यासाठी १७ बसेसची व्यवस्था दि. ०६ एप्रिल २०२१ पासून डॉ. आशिष देशमुख यांनी करून दिली. कडक उन्हामुळे आणि ग्रामीण भागात वाहन-साधनांचा अभाव असल्यामुळे या बस-सेवेचा नागरिकांना फायदा मिळत आहे.