काळ नदीवरील बंधाऱ्यांची कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
Summary
मुंबई, दि. 2 : रायगड जिल्ह्यातील काळ नदीवरील मौजे कुंभार्ते (ता.माणगाव) येथील बंधाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. काळ नदीवर मौजे कुंभार्ते, पो.निजामपूर येथे दोन सिमेंट बंधाऱ्याच्या कामाबाबत बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले. बैठकीस […]

मुंबई, दि. 2 : रायगड जिल्ह्यातील काळ नदीवरील मौजे कुंभार्ते (ता.माणगाव) येथील बंधाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
काळ नदीवर मौजे कुंभार्ते, पो.निजामपूर येथे दोन सिमेंट बंधाऱ्याच्या कामाबाबत बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले. बैठकीस आमदार प्रकाश सुर्वे, मृद व जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता तथा उपसचिव श्री.देवराज, कार्यकारी अभियंता हरीभाऊ राणे उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या निर्देशानुसार मृद व जलसंधारण विभागाद्वारे बंधाऱ्याच्या ठिकाणी सर्वेक्षण करुन बंधारा कामाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून मान्यता देऊन बंधाऱ्याचे काम सुरु झाले.
पावसाळी हंगाम संपत आल्यानंतर कुंभार्ते व जवळच्या शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोर जावे लागते. याबाबत आमदार प्रकाश सुर्वे यांनी गावाजवळ बंधारा बांधून मिळण्याबाबत मागणी केली होती. यावर श्री.भरणे यांनी जलसंधारण विभागाने तात्काळ प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिले.
कोविड-19 कालावधीमध्ये कामाच्या गतीवर परिणाम झाला. मात्र आता या कामाला गती देऊन येत्या मार्चपूर्वी काम पूर्ण होईल याकडे यंत्रणेने लक्ष द्यावे, असे स्पष्ट निर्देश श्री. भरणे यांनी यावेळी दिले.
हे बंधारे पूर्ण झाल्यानंतर पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार असून शेतकऱ्यांना अधिकचे पीक उत्पादन काढणे शक्य होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.