BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

‘आजी-आजोबा, शिक्षक व मुले’ बैठकीतून आंतरपिढी संवादाला चालना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शाळा-महाविद्यालयांत ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ शपथ

Summary

मुंबई, दि. ३० : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ शपथ घ्यावी तसेच ‘आजी-आजोबा, शिक्षक व मुले’ (जीपीटीएम) बैठकीचे आयोजन करावे, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री (सामाजिक न्याय) […]

मुंबई, दि. ३० : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ शपथ घ्यावी तसेच ‘आजी-आजोबा, शिक्षक व मुले’ (जीपीटीएम) बैठकीचे आयोजन करावे, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री (सामाजिक न्याय) माधुरी मिसाळ आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे यांनी केले आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या नातवंडांच्या शाळेत उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्याच्या सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासन निर्णय, ९ जुलै २०१८ मधील तरतुदीनुसार दरवर्षी १ ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ८ मे २०२५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याबाबत शपथ घेणे तसेच ‘आजी-आजोबा, शिक्षक व मुले’ (जीपीटीएम) बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार, राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ शपथ घेण्यात यावी. तसेच सर्व शाळांमध्ये जीपीटीएम बैठकीचे आयोजन करण्यात यावे. या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव, ज्ञान, संस्कार व जीवनमूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच आंतरपिढी संवादाला चालना देणे आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना वृद्धिंगत करणे हा उद्देश आहे. राज्यातील शाळा व महाविद्यालयांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक दृढ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *