वैनगंगा पात्रात मध्यरात्रीची धाड! रेती चोरीचा डाव उधळला; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
पवनी : वैनगंगा नदीच्या शांत पात्रात मध्यरात्रीच्या सुमारास सुरू असलेला रेती चोरीचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. मौजा मांगली शिवारात केलेल्या धाडीत तब्बल १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
१३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १.३० ते ३.०० वाजण्याच्या दरम्यान पोलीस हवालदार श्रीकांत मस्के हे स्टाफसह मांगली शिवार परिसरात पेट्रोलिंग करत होते. वैनगंगा नदीपात्रात संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. तेव्हा काही जण ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळले.
पोलिसांनी घटनास्थळी तुळशिदास दिवाकर हटवार (२१), दीपक रमेश गभने (३१) आणि रूपेश ज्ञानेश्वर तरेकर (२५) या तिघांना ताब्यात घेतले. तर ज्ञानेश्वर धनराज वैद्य (२२) हा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. सर्व आरोपी मांगली (ता. पवनी) येथील रहिवासी आहेत.
कारवाईदरम्यान खालील वाहने जप्त करण्यात आली—
स्वराज ८४३ एक्सएम कंपनीचा निळा-पांढरा विनाक्रमांक ट्रॅक्टर व ट्रॉली (अंदाजे किंमत ६ लाख रुपये)
ईरो पावरटैंक कंपनीचा निळा विनाक्रमांक ट्रॅक्टर व रिकामी ट्रॉली (६ लाख रुपये)
मॅसी फर्ग्युसन २४५ डीआय कंपनीचा लाल विनाक्रमांक ट्रॅक्टर व रिकामी ट्रॉली (६ लाख रुपये)
असा एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन पवनी येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ६२, ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार नागरीकर करीत आहेत.
नदीपात्रातील बेकायदेशीर उत्खनन आणि रेती तस्करीवर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाई करत स्पष्ट संदेश दिला आहे—वैनगंगा पात्रात ‘रेती माफियां’चा डाव आता चालणार नाही.
