नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळीकरांचा ‘अंधाराविरुद्ध एल्गार’! राष्ट्रीय महामार्गावर अपूर्ण कामांमुळे अपघातांचा धोका; तातडीच्या कारवाईची जोरदार मागणी

Summary

नागपूर / कोंढाळी | प्रतिनिधी नागपूर–अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (पूर्वीचा क्र. ६) हा विदर्भातील सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र कोंढाळी नगर पंचायत हद्दीतून जाणाऱ्या या महामार्गावर चौपदरीकरण पूर्ण झाले असले, तरी स्ट्रीट लाईट, ड्रेनेज आणि दुभाजकांवरील […]

नागपूर / कोंढाळी | प्रतिनिधी
नागपूर–अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (पूर्वीचा क्र. ६) हा विदर्भातील सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र कोंढाळी नगर पंचायत हद्दीतून जाणाऱ्या या महामार्गावर चौपदरीकरण पूर्ण झाले असले, तरी स्ट्रीट लाईट, ड्रेनेज आणि दुभाजकांवरील सुरक्षारेलिंगची कामे अर्धवट राहिल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी कोंढाळीकरांनी आता आवाज उठवला असून, सामाजिक कार्यकर्ते दुर्गा प्रसाद पांडे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे निवेदन सादर केले आहे.
स्ट्रीट लाईट ‘अर्ध्यावर’, महामार्गावर अंधाराचे साम्राज्य
कोंढाळी नगर पंचायत क्षेत्रातील महामार्गावर पथदिव्यांचे काम संथ गतीने आणि अपूर्ण स्वरूपात करण्यात आले आहे. सध्या हे दिवे केवळ पोलीस स्टेशनसमोरील पेट्रोल पंपापर्यंतच कार्यान्वित आहेत. त्यापुढील संपूर्ण भाग रात्री पूर्ण अंधारात जातो.
माहितीनुसार, अजून सुमारे १२ स्ट्रीट लाईट पोल बसवणे शिल्लक असून, दुभाजकांवर पथदिवेच नसल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज लागत नाही. परिणामी, या भागात वारंवार अपघात घडत असल्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
सर्व्हिस रोडवर ड्रेनेज अपूर्ण; पावसाळ्यात धोका
महामार्गालगत असलेल्या उड्डाणपुलाच्या बाजूला सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे. मात्र, या रोडवरील ड्रेनेज व्यवस्था अद्याप अपूर्ण आहे. उघड्या व मोडकळीस आलेल्या सांडपाणी वाहिन्यांमुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून दुर्गंधी, आरोग्य समस्या आणि रस्त्याचे नुकसान होत आहे.
आगामी पावसाळ्यात ड्रेनेजचे काम पूर्ण न झाल्यास सर्व्हिस रोडवर पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाला साकडे; उच्चस्तरीय निवेदने
या प्रश्नांबाबत दुर्गा प्रसाद पांडे यांनी खालील अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना लेखी निवेदन दिले आहे—
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी
आमदार चरणसिंह ठाकूर (काटोल विधानसभा)
योगेश चाफले, अध्यक्ष – नगर पंचायत कोंढाळी
सी.एम.डी., राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नागपूर)
प्रकल्प संचालक, NHAI (अमरावती–नागपूर विभाग)
मुख्याधिकारी, नगर पंचायत कोंढाळी
निवेदनात केवळ पथदिवेच नव्हे, तर दुभाजकांवरील लोखंडी सुरक्षारेलिंगचे कामही तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जनतेचा सवाल : टोल घेतला जातो, सुविधा कुठे?
कोंढाळी ही मोठी बाजारपेठ असून येथे २४ तास वाहतूक सुरू असते. अपूर्ण कामांमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे जीवघेणे ठरत आहे.
“जर राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूल केला जातो, तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मूलभूत सुविधा का नाहीत?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक व जनप्रतिनिधींनी उपस्थित केला आहे.
याबाबत संजय राऊत, स्वप्निल व्यास, विनोद माकोडे, प्रज्वल धोटे, बंदे रहमान शेख, राहुल नासरे, सनोबर शेख, आम्रपाली नारनवरे, शेख गफ्फार, गौरव इरखेडे, अंकित चव्हाण, कुणाल भांगे, आयुष्य मान पांडे, बबलू बिसेन, राजा बेग, अफसर हुसेन, विकास कामडी, इरफान शेख, अंकित धोटे, संजय गायकवाड, परिमल हिंगणकर, शुभम चौधरी, चंद्रशेखर चरडे, विशाल व्यवहारे, करण व्यवहारे, रोहित गोलाईत, रमजान पठाण यांच्यासह अनेक नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
गडकरींकडून लक्ष देण्याचे संकेत
कोंढाळी व वर्धा टी-पॉइंटवरील सुरक्षाव्यवस्थेबाबत भाजप पदाधिकारी प्रमोद चाफले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्वतंत्र निवेदन दिले असून, त्यावर तातडीने लक्ष देण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे.
आता कोंढाळीकरांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महामार्गावरील हे ‘अंधारयुग’ कधी संपणार? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *