खेळाच्या मैदानात दडलाय ‘हाय व्होल्टेज’ मृत्यू! शाळेत शिक्षणाचे धडे अन् माथ्यावर ‘मौत का तांडव’; ३०० निष्पाप नौनिहालांचा जीव टांगणीला!
विशेष तपासणी वृत्त / शहडोल (मध्य प्रदेश):
एका बाजूला किलबिलणाऱ्या चिमुकल्यांचा मनमोकळा हास्यकल्लोळ, तर दुसऱ्या बाजूला अगदी डोक्यावरच साक्षात घोंगावणारं ‘हाय व्होल्टेज’ मरण! शिक्षणाच्या पवित्र मंदिरात रोज शेकडो लहान मुले भविष्याची स्वप्ने रंगवण्यासाठी येतात; पण कुणाला ठाऊक होतं की, ज्या मैदानात ते आनंदाने उड्या मारत आहेत, तिथेच मृत्यूचा महाभयंकर ‘टाईम बॉम्ब’ टिक-टिक करतोय!
शहडोल जिल्ह्यातील जयसिंगनगर अंतर्गत सीमावर्ती ग्रामपंचायत ‘सीधी’ येथील शासकीय हायस्कूल परिसर सध्या एखाद्या धगधगत्या ज्वालामुखीच्या टोकावर उभा आहे.
’खेळाचे मैदान’ की ‘मौत का आखाडा’?
शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे ३०० हून अधिक आदिवासी व इतर वर्गांतील निष्पाप विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नुकतीच बाउंड्रीवॉल झाल्याने मुलांच्या खेळाचा मार्ग मोकळा झाला खरा, पण या मैदानातच उभा आहे एक हाय-व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आणि जिवंत विजेच्या तारांचे जाळे!
खेळताना एखादा चेंडू त्या जिवंत तारांना जाऊन धडकला, किंवा अनधानाने एखादा लहानगा त्या ट्रान्सफॉर्मरच्या जवळ गेला तर? वादळ-वाऱ्याने ती जिवंत तार खाली तुटून पडली तर? या एकाच कल्पनेने संपूर्ण परिसराचा थरकाप उडत आहे. ही केवळ निष्काळजीपणाची सीमा नाही, तर प्रशासन उघड्या डोळ्यांनी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत असल्याचाच हा जिवंत पुरावा आहे!
’ऑन द स्पॉट’ पाहणी करा; भाजप नेत्याने उठवला आवाज
या गंभीर आणि थरारक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी स्थानिक रहिवासी तथा भाजप अंत्योदय प्रकोष्ठचे जिल्हा संयोजक बीरेंद्र पाण्डेय यांनी प्रत्यक्ष मैदानावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
“मुलांच्या अजाण वयात त्यांना या धोक्याची अजिबात जाणीव नाही. ३०० पेक्षा जास्त मुलांच्या जिवाशी खेळण्याचा हा संतापजनक प्रकार आहे. वीज विभागाने आणि प्रशासनाने तात्काळ हा ट्रान्सफॉर्मर शाळेच्या आवाराबाहेर हलवावा,” अशी आक्रमक मागणी बीरेंद्र पाण्डेय यांनी केली आहे.
आई-वडिलांच्या डोळ्यांत भीतीची आसवे!
“आमची मुले डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक बनण्याची स्वप्ने पाहत शाळेत जातात. पण ते सुखरूप घरी परत येतील का, या भीतीने आमचा रोज जीव वर-खाली होतो,” असा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पालकांनी व्यक्त केला आहे. दुर्घटना घडल्यानंतर चौकशीचे नाटक करण्यापेक्षा, दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने जागे व्हावे, असा थेट इशाराच पालकांनी आणि शाळेच्या शिक्षकांनी दिला आहे.
सहाय्यक आयुक्त अन् जिल्हाधिकाऱ्यां समोर यक्षप्रश्न!
हे विद्यालय आदिवासी विकास विभागांतर्गत येत असल्याने जबाबदारी दुप्पट होते. त्यामुळे आता स्थानिक नागरिक आणि पालकांनी सहाय्यक आयुक्त (आदिवासी विकास विभाग) व जिल्हाधिकारी (शहडोल) यांच्याकडे ‘ऑन द स्पॉट’ निरीक्षणाची मागणी केली आहे:
तात्काळ संयुक्त पाहणी: सहाय्यक आयुक्तांनी स्वतः वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या ‘डेथ झोन’ची प्रत्यक्ष पाहणी करावी.
ट्रान्सफॉर्मरचे स्थानांतरण: ग्रामपंचायतीच्या संमतीने शाळेच्या आवारातील तो ट्रान्सफॉर्मर आणि जिवंत तारा तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात याव्यात.
स्वतःहून दखल घ्या: वीज विभागाने कोणत्याही अर्जाची किंवा मोठ्या अपघाताची वाट न पाहता स्वतःहून या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी.
आता प्रश्न थेट प्रशासनाला…
शिक्षणाचे मंदिर वीजप्रवाहाचा धोकादायक अड्डा बनले असताना, प्रशासन आणखी कोणाच्या बलिदानाची वाट पाहत आहे? एखाद्या चिमुकल्याचा बळी गेल्यावरच यंत्रणा जागी होणार का?
शहडोलचे जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त यावर ‘ऑन द स्पॉट’ कारवाई करून त्या ३०० नौनिहालांना मृत्यूच्या छायेतून बाहेर काढणार की कागदी घोड्यावरच कारभार चालणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
