१५ जानेवारीला ‘राज्य क्रीडा दिन’; शाळा–महाविद्यालयांत रंगणार क्रीडोत्सव
मुंबई | प्रतिनिधी
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मृतीला उजाळा देत राज्यात क्रीडाक्षेत्राला नवी ऊर्जा देण्याचा निर्धार करण्यात आला असून, १५ जानेवारी हा दिवस ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर १२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध क्रीडाविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
क्रीडाक्षेत्रात भारताचा मान उंचावणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणे, तसेच नवोदित खेळाडूंमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, शिस्त आणि उत्कृष्टतेची प्रेरणा निर्माण करणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः मुंबई उपनगर जिल्ह्यात या चार दिवसांत शालेय व महाविद्यालयीन स्तरावर क्रीडाजागर घडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
क्रीडादिनानिमित्त विविध उपक्रम
या उपक्रमांतर्गत खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व क्रीडाक्षेत्रातील योगदानावर व्याख्याने, क्रीडा संस्कृती जतन व संवर्धनासाठी रॅली, मॅरेथॉन स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांच्या नियमावलीवर मार्गदर्शन शिबिरे, ऑलिम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती देणारे सत्र आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासोबतच नामवंत खेळाडूंशी ऑनलाईन संवाद, विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने, विजेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळा तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरवही करण्यात येणार आहे.
अहवाल सादर करणे बंधनकारक
राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या सर्व उपक्रमांच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा कार्यालयाचा बॅनर लावणे अनिवार्य राहणार आहे. तसेच या उपक्रमांचा सविस्तर अहवाल Instagram Reel व YouTube ध्वनिफित स्वरूपात तयार करून dsomumbaisub@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उत्कृष्ट उपक्रमांना रोख पारितोषिक
उत्कृष्ट नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या पहिल्या तीन संस्थांना अनुक्रमे ₹१०,०००, ₹७,००० आणि ₹५,००० रोख पारितोषिकांसह गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
राज्य क्रीडा दिनाच्या निमित्ताने खेळ, शिस्त आणि आरोग्य यांचा संदेश घराघरात पोहोचवण्याची हीच संधी आहे, असे मत क्रीडा क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
