गोंदिया महाराष्ट्र हेडलाइन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जिवंत प्रतीक म्हणजे समता सैनिक दल – रोशन फुले सरांडी/बूज येथे समता सैनिक दलाचा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Summary

लाखांदूर | प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारलेली, अन्याय-विषमतेविरोधात संघर्ष करणारी चळवळ म्हणजे समता सैनिक दल असून ते बाबासाहेबांच्या विचारांचे जिवंत आणि लढाऊ प्रतीक आहे, असे ठाम प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक रोशन फुले यांनी केले. सरांडी/बूज येथे दिनांक ६ जानेवारी २०२६ […]

लाखांदूर | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारलेली, अन्याय-विषमतेविरोधात संघर्ष करणारी चळवळ म्हणजे समता सैनिक दल असून ते बाबासाहेबांच्या विचारांचे जिवंत आणि लढाऊ प्रतीक आहे, असे ठाम प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक रोशन फुले यांनी केले. सरांडी/बूज येथे दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी समता सैनिक दलाचा ६ वा वर्धापन दिन प्रचंड उत्साह, शिस्तबद्ध संचलन आणि घोषणांच्या गजरात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करून, महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण व वंदना घेऊन करण्यात आली. त्यानंतर दलाचे शिस्तबद्ध संचलन सादर झाले. याचप्रसंगी ‘जय भीम’चे जनक बाबू हरिदास एल.एन. यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
मार्गदर्शन करताना रोशन फुले म्हणाले की, “जेव्हा अन्याय डोके वर काढतो, संविधान धोक्यात येते आणि दलित-वंचित-शोषितांवर अत्याचार होतो, तेव्हा समता सैनिक दल पहिल्या रांगेत उभे राहते. आपल्या हातात बंदूक नसली तरी छातीत विचारांची ताकद आहे. समता सैनिक दलाचा युवक कधीही मूक प्रेक्षक नसून तो संघर्षाचा शिलेदार असतो. मोबाईल हा केवळ रील्स पाहण्यासाठी नव्हे, तर विचार पसरवण्यासाठीचे शस्त्र आहे. शिक्षणाचा उपयोग नोकरीपुरता मर्यादित न ठेवता समाजपरिवर्तनासाठी करावा.”
वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांनी संविधान वाचवण्याचा, बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि समतेचा झेंडा अखंड फडकवत ठेवण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. सी. फुल्लुके (जिल्हा प्रमुख) होते. उद्घाटक म्हणून विलास नागदेव उपस्थित होते. तसेच सी. डी. गौरे, धनपालजी गडपायले, सूर्यप्रकाशजी मेश्राम, राजहंस रामटेके, सेवक पिल्लेवान, मंगला सरजारे, वनिता मेश्राम, सुचिता गोस्वामी, संगीता गोंडाने, लालाजी बनकर, मुखरंजी मेश्राम, महादेवजी फुलझले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन शरदजी धनविजय यांनी केले, प्रास्ताविक शालुताई रामटेके यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योतीताई धनविजय (शाखा प्रमुख), तन्नू माटे, श्रीदेवी बनकर, बबिताबाई फुलझले, संगीता बाई धनविजय तसेच समस्त समता सैनिक दलाच्या सैनिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता समापन वंदनेने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *