BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई रोजगार शिक्षण हेडलाइन

मुंबईत उद्या राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेची कार्यशाळा

Summary

मुंबई, दि. १८ : केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातंर्गत राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET) आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोन्मेष विभाग (SEEID), महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम विभागीय क्षमतावृद्धी व जनजागृती कार्यशाळेचे उद्या १९ सप्टेंबर रोजी […]

मुंबई, दि. १८ : केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातंर्गत राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET) आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोन्मेष विभाग (SEEID), महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम विभागीय क्षमतावृद्धी व जनजागृती कार्यशाळेचे उद्या १९ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे सकाळी ९.३० ते सायं. ६ च्या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.

देशातील तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगारासाठी प्रेरित करणे हे  व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांचे महत्वपूर्ण  कार्य असून यासंदर्भात अभ्यासक्रमांना मान्यता आणि मूल्यांकन करून योग्य मार्गदर्शन करणे हे राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कार्यशाळेत मुख्य सचिव राजेश कुमार, केंद्रीय कौशल्य विकास विभागाच्या सचिव देबश्री मुखर्जी, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET) च्या कार्यकारी सदस्य डॉ. विनीता अग्रवाल, संचालक गुंजन चौधरी, महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यासह महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण-दीव तसेच दादरा-नगर हवेली येथील विविध भागधारक सहभागी होणार आहेत. व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण (DVET) संस्था अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी तसेच या संस्थेच्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती या कार्यशाळेत दिली जाणार आहे.

कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय कौशल्य विकास उपक्रम, मानके व गुणवत्ता हमी यावर लक्ष केंद्रीत करून राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेच्या नियामक भूमिकेवर चर्चा होणार आहे. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, ग्रीन हायड्रोजन यांसारख्या भविष्यातील उदयोन्मुख कौशल्यांवरील प्रशिक्षण, अवार्डिंग बॉडीज व मूल्यमापन संस्था यांची नोंदणी व कार्यपद्धती, विविध कौशल्य विकास उपक्रमांचे एकत्रीकरण आणि शालेय तसेच उच्च शिक्षण व्यवस्थेत व्यावसायिक शिक्षणाचा समावेश या विषयांवर विशेष चर्चासत्रे होणार आहेत. कार्यशाळेत भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातील मान्यवर, महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी व राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *