तुमसर मोहाडी तालुक्यातील कोतवाल, पोलीस पाटील भरती घोळ दोषींवर कार्यवाही करून भरती नव्याने घ्या ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन भंडाराची पत्र परिषदेतून मागणी
प्रतिनिधी तुमसर
ज्यांना धड लिहिता वाचता येत नाही, जे दहावी-बारावीत धक्के खाऊन अगदी किनाऱ्यावर पास होणारे विद्यार्थी पैशांच्या जोरावर कोतवाल आणि पोलीस पाटील भरती परीक्षेत मेरिटमध्ये आलेच कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी भरती प्रक्रियेत मोठा घोळ झाला असून दोषी अधिकारी यांच्यावर कार्यवाही करून नव्याने पारदर्शी भरती प्रक्रिया घेण्याची मागणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने पत्रकार परिषदेत केली. आहे.
सदर भरती प्रक्रिया राबविताना तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय तुमसर व मोहाडी यांचे कार्यालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्याच्या अनुषंगाने कोतवाल, पोलीस पाटील भरतीच्या अर्जदारांकडून मागविण्यात आले. सदर भरती प्रक्रिया घेण्यात आली. परीक्षेत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य जनतेत व परीक्षार्थी मध्ये घोळ झाल्याची चर्चा आहे. प्रश्न पत्रिकेचे चुकीचे स्वरूप, प्रश्न पत्रिकेतील अनेक चुका, आदर्श उत्तर पत्रिकेतील चुका, प्रश्न पत्रिका ही इयत्ता चौथ्या वर्गापर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित न काढता चुकीच्या पद्धतीने काढलेली प्रश्नपत्रिका, पोलीस पाटील-कोतवाल पदाची संबंधित विषयाला अनुसरून मुलाखत न घेणे, गुणवत्तेनुसार अंतिम यादी उरलेल्या वेळेनुसार प्रकाशित न करणे, ठरलेल्या वेळेनुसार परीक्षा न घेणे, वेळेच्या आधीच्या आदर्श उत्तर पत्रिका पोर्टलवर न देता परीक्षा केंद्राच्या भिंतीवर लावणे, आपल्या जाहीरनाम्यातील नियमांचे उल्लंघन करणे, याबाबत परीक्षार्थी वारंवार समितीकडे आक्षेप नोंदवण्याकरिता गेले असता त्यांचे निवेदन न स्वीकारणे, यावरून कोतवाल-पोलीस पाटील भरती समिती सन २०२३ कडून सदर परीक्षा पारदर्शक रित्या गांभीर्यपूर्वक घेण्यात आली नसल्याचे दिसून येते. असा आरोप पत्रकार परिषदेत परीक्षार्थीसह ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशनने केला असून परीक्षार्थी वर अन्याय होणार नाही व त्यांना न्याय मिळेल याकरिता फेरपरीक्षा घेण्यात यावी व तात्काळ न्याय न मिळाल्यास ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन भंडारा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही पत्रकार परिषदेतून दिला. यावेळी पत्रकार परिषदेत वैभव चोपकर सह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
