जिल्ह्यातील खनीज संपत्तीचा उपयोग करून रोजगार निर्मितीला चालना देणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
Summary
चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोबर : चंद्रपूर हा खनीज संपत्तीने समृध्द जिल्हा आहे. गौण खनिजमधून राज्याला मिळणारे सर्वाधिक महसुली उत्पन्न आपल्या जिल्ह्याचे आहे. खनिकर्म विभागाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो. कोळसा, चुनखडक, लोहखनीज याशिवाय तांबे हे एक धोरणात्मक […]
चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोबर : चंद्रपूर हा खनीज संपत्तीने समृध्द जिल्हा आहे. गौण खनिजमधून राज्याला मिळणारे सर्वाधिक महसुली उत्पन्न आपल्या जिल्ह्याचे आहे. खनिकर्म विभागाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो. कोळसा, चुनखडक, लोहखनीज याशिवाय तांबे हे एक धोरणात्मक खनीज असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तांब्याची महत्वपूर्ण भुमिका आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 11 कोटी टन तांबे उपलब्ध असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खनीज संपत्तीचा उपयोग करून रोजगार निर्मितीस चालना देण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय अंतर्गत प्रादेशिक कार्यालयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा खनीकर्म अधिकारी सुरेश नैताम, भुवैज्ञानिक निखील अपराजीत,ओंकारसिंग भोंड, अमोल कळसकर, विद्या खरवडकर, अलका खेडकर, डॉ. मंगेश गुलवाडे, अंजली घोटेकर आदी उपस्थित होते.
पृथ्वीच्या गर्भात असलेली अमुल्य खनीज संपत्ती शोधून काढणे, मर्यादेत उत्खनन करणे व त्याद्वारे मानव विकास साधून पर्यावरण समतोल राखणे महत्वाचे आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यातील या खनीज साधनसंपत्तीचा विकासाच्या व रोजगार निर्मितीच्या दृष्टीने नक्कीच उपयोग करण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यात असलेल्या विविध प्रकारच्या खडकांचा बिल्डींग मटेरियलकरीता उपयोग होऊ शकतो. याबाबत कृती आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील खनीज संपत्तीबाबत मंत्री / सचिव स्तरावर लवकरच बैठक घेऊन जिल्ह्याचे धोरण ठरवता येईल. त्यासाठी खनीकर्म विभागाचे शासन निर्णय, कलम, नियम, कोणते बदल अपेक्षित आहेत, याची संक्षिप्त माहिती उपलब्ध करून द्यावी. तसेच खनीज संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी विविध ठिकाणी भेटी देऊन टिपण तयार करावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी त्यांनी इंडियन ब्युरो ऑफ मायनिंगच्या दरानुसार लिलावाची काय पध्दत आहे, त्याचे दर कसे ठरतात, लोहखनीज तयार होण्याची प्रक्रिया काय, सर्व्हेक्षण करायला किती कालावधी लागतो, कोणताही मायनिंग प्लान कसा सादर केला जातो, मायनिंग प्लॉनच्या नियमांची माहिती आदींबाबत माहिती जाणून घेतली.