गोंदिया महाराष्ट्र हेडलाइन

गोंदिया जिल्ह्यातील विद्युत पुरवठ्याची गुणवत्ता वाढविण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश

Summary

गोंदिया,दि.28 : राज्यातील ग्रामीण भागात शेतीसह औद्योगिक विकास होणे गरजेचे आहे. बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी ग्रामीण भागात उद्योग उभारावे लागतील. उद्योग उभारण्यासाठी वीज आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या विद्युत पुरवठ्याबाबत अनेक समस्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील विद्युत पुरवठ्याची […]

गोंदिया,दि.28 : राज्यातील ग्रामीण भागात शेतीसह औद्योगिक विकास होणे गरजेचे आहे. बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी ग्रामीण भागात उद्योग उभारावे लागतील. उद्योग उभारण्यासाठी वीज आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या विद्युत पुरवठ्याबाबत अनेक समस्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील विद्युत पुरवठ्याची गुणवत्ता वाढविण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.

28 ऑगस्ट रोजी एन.एम.डी.कॉलेज सभागृह,गोंदिया येथे आयोजित आढावा बैठकीत डॉ.राऊत बोलत होते. यावेळी आमदार सहेषराम कोरोटे, महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता गोंदिया श्री वासनिक, अधिक्षक अभियंता गोंदिया सम्राट वाघमारे, अधिक्षक अभियंता भंडारा राजेश नाईक, कार्यकारी अभियंता गोंदिया श्री वानखेडे, कार्यकारी अभियंता देवरी श्री फुलझेले, महापारेषणचे अधिक्षक अभियंता श्री अने, गोंदिया विभागाचे मुख्य अभियंता आनंद जैन, गोंदिया महावितरणचे जनसंपर्क अधिकारी अविनाश साखरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

डॉ.राऊत पुढे म्हणाले, कृषिपंप वीज जोडणी धोरण-2020 अंतर्गत अर्जदारांचे कृषिपंप वीज जोडणीची प्रकरणे प्रलंबीत न ठेवता तातडीने निकाली काढण्यात यावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा कसा देता येईल याकडे लक्ष केंद्रीत करावे. भंडारा येथील विद्युत शॉर्ट सर्कीटच्या घटनेची पुनरावृत्ती गोंदिया जिल्ह्यात होऊ नये म्हणून सर्व शासकीय कार्यालयातील फायर ऑडिट लवकरात लवकर झाले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार श्री कोरोटे म्हणाले, ककोडी येथे विद्युत वितरणचे सब स्टेशन तयार कण्यात यावे, जेणेकरुन त्या भागातील नागरिकांचे विद्युत पुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी आदिवासी विकास मंत्रालयाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी मंत्री महोदयांकडे केली. वीज वितरण विभागाचे कर्मचारी ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण न करता उलटसुलट उत्तरे देतात याबाबत संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकातून अधिक्षक अभियंता सम्राट वाघमारे यांनी विद्युत विभागामार्फत गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, पुर्व विदर्भ योजना, कृषिपंप उच्चदाब वितरण प्रणाली योजना, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, कृषिपंप वीज जोडणी धोरण-2020, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना इत्यादी योजनेबाबत संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून सादरीकरणाद्वारे मंत्री महोदयांना विस्तृत माहिती दिली.

गोंदिया जिल्ह्यात 8 तालुके असून 556 ग्रामपंचायती आहेत. 954 गावे आहेत. गोंदिया महावितरण मंडळाअंतर्गत 2 विभाग आहेत. उपविभाग 9 आहेत. शाखा 33 आहेत तर मनुष्यबळ 801 आहे. जिल्ह्याअंतर्गत उपकेंद्र संख्या 46 आहे. क्षमता 423.15 एमव्हीए आहे. उच्चदाब वाहिनी 4514.97 कि.मी.आहे. लघुदाब वाहिनी 9204.67 कि.मी.आहे. वितरण रोहित्रे संख्या 8180 आहे. वितरण रोहित्र क्षमता 562.65 एमव्हीए आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत घरगुती ग्राहक संख्या 264831 आहे. व्यवसायीक ग्राहक संख्या 13349 आहे. औद्योगिक ग्राहक संख्या 2951 आहे. कृषि ग्राहक 37666 आहेत. उच्चदाब ग्राहक 79 आहेत. अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

भूमिगत लघुदाब विद्युत वाहिनीचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

गोंदिया येथील मनोहरभाई कॉलनी येथे आज 28 ऑगस्ट रोजी ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते भूमीगत केलेल्या लघुदाब विद्युत वाहिनीचे लोकार्पण करण्यात आले. ही भूमीगत विद्युत वाहिनी 4 कि.मी. पर्यंत राहणार असून त्याचा लाभ परिसरातील ग्राहकांना होणार आहे. भविष्यात संपूर्ण गोंदिया शहरात भूमीगत विद्युत वाहिनी निर्मिती करण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास पदाधिकारी व महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *