बिड महाराष्ट्र हेडलाइन

कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी होण्यासाठी कडक उपाययोजना

Summary

बीड,दि.30 (जि.मा.का.): कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने नियम शिथिलता मिळालेली नाही. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर कमी व्हावा यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात तसेच नागरिकांनी घालून […]

बीड,दि.30 (जि.मा.का.): कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने नियम शिथिलता मिळालेली नाही. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर कमी व्हावा यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात तसेच नागरिकांनी घालून दिलेल्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

आष्टी, पाटोदा शिरूर तालुक्यात बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असून, यावर उपाय म्हणून पोलीस खात्याच्या मदतीने नगर व अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारून अँटिजेन टेस्टिंग करून मगच प्रवेश देण्यात यावा, तसेच याची अंमलबजावणी उद्यापासूनच करावी असे निर्देश ना. मुंडे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले.

कोरोना (Covid-19 ) आणि लसीकरणा बाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे पालक मंत्री ना. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते, बैठकीसाठी आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे , प्र.जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे , मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा, अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्रीमहोदय पुढे म्हणाले जिल्ह्यातील आरोग्य व प्रशासन यंत्रणांनी तिसऱ्या लाटेच्या धोक्यासाठी सज्ज राहावे. जिल्ह्यातील पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर, औषधेल, इंजेक्शन्स, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता व सुसज्जता ठेवण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

बीड जिल्ह्यासाठी अधिक लस उपलब्ध कराव्यात आरोग्य संचालक अर्चना पाटील यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना

बैठकीमध्ये आढाव्यादरम्यान जिल्ह्यात आठवड्यास 10 हजार लस उपलब्ध होत असल्याचे दिसून आले. जिल्ह्याची क्षमता प्रतिदिन 1 लाख लसीकरणाची असून राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यात लस उपलब्धतेचे प्रमाण वाढावे. यासाठी मंत्रीमहोदयांनी बैठकीतून थेट राज्याच्या आरोग्य संचालकांना दूरध्वनी करून सूचना दिल्या. यावेळी राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी ऑगस्ट महिन्यापासून बीड जिल्ह्यात लसींचा तुटवडा भासणार नाही, असे आश्वस्त केले.

याच बरोबर लोक प्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार परळी -आष्टी आदी ठिकाणी सिटीस्कॅन नियंत्रणाची उपलब्धता, आष्टी सह ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन निर्मितीची व्यवस्था, शिरूर येथे सामाजिक समाज कल्याण हॉस्टेल मध्ये असलेल्या रुग्णालयात 100 बेड ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव करणे आणि तातडीने मंजुरी देणे बाबत संबंधित अधिकाऱ्यांना पालक मंत्री श्री मुंडे यांनी निर्देश दिले.

जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालय स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय आणि लोखंडी सावरगाव येथील महिला रुग्णालय येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहेत जिल्ह्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय यासह कोवीड रुग्णालयांमध्ये आणखी ऑक्सिजन निर्मिती क्षमता प्रस्तावित करण्यात आली असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटे साठी जिल्हा यंत्रणांना सुसज्ज केल्या जात आहेत असे सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार म्हणाले कोरोना डोक्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करताना पेडियाट्रिक डॉक्टर्स ची आवश्यकता कमतरता असल्याने इतर डॉक्टर्सना प्रशिक्षण देऊन तयार केले आहे जिल्हा रुग्णालय आणि स्वाती वैद्यकीय महाविद्यालय येथे 100 बेडचे पेडियाट्रिक आयसीयू सज्ज ठेवण्यात आले आहे यासह 560 आय सी यू बेड विविध शासकीय रुग्णालयात सुसज्ज आहेत.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास आरोग्य व सुरक्षा यंत्रणेवर ताण येत येतो याचा विचार करून पुढील काळात जवळ असलेल्या चौसाळा, राजुरी, चार्हाठा येथे

कोरोना उपचारांसाठी ऑक्सीजन बेड असलेले कोविड सेंटर सुसज्ज केले जावे. जिल्हा रुग्णालयातील सिंगल स्लाईस सिटीस्कॅन यंत्रणाचे रूपांतर अत्याधुनिक केले जावे ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्यात यावे यासाठी सिटी स्कॅन मशीन खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ना. मुंडेंनी दिले.

आ. बाळासाहेब आजबे यांनी शिरूर येथे ऑक्सीजन बेडची आवश्यकता असून आष्टी येथे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प तातडीने व्हावा, आणि व्हेंटिलेटर ची उपलब्धता व्हावी असे सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी प्रास्ताविक केले . तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे, स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे आणि  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर बी पवार यांनी माहिती सादर केली. बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे सभापती कल्याण आबुज तसेच श्री. शिवाजी शिरसाट उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील जवळपास सात लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यापैकी दुसरा डोस दिलेले पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या 1 लाख 63 हजार आहे आज  जिल्ह्यात 263, व्हेंटिलेटर 208 बायोपॅप मशीन आणि 1020 कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आहेत. तसेच संभाव्य लाटेच्या दृष्टीने लहान मुलांसाठी एनआयसीयूसह आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत संबंधितांना ना. मुंडेंनी सूचना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *