BREAKING NEWS:
महाराष्ट्र विज्ञानं-तंत्रज्ञान

*विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना बारावी बोर्डाच्या परीक्षेत शिक्षणशास्त्र विषय घेऊन बसण्याची परवानगी देण्यात यावी अन्यथा आंदोलन* *डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा इशारा*

Summary

नागपुर:- इयत्ता अकरावी बारावी मध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षणशास्त्र हा ऐच्छिक विषय निवडण्याची सुविधा होती. परंतु पुनर्रचित अभ्यासक्रम 2019- 20 पासून राज्य शिक्षण मंडळाने सदर विषय केवळ कला शाखेसाठी ऐच्छिक केल्यामुळे एप्रिल-मे 2021 मध्ये होऊ घातलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान […]

नागपुर:- इयत्ता अकरावी बारावी मध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षणशास्त्र हा ऐच्छिक विषय निवडण्याची सुविधा होती. परंतु पुनर्रचित अभ्यासक्रम 2019- 20 पासून राज्य शिक्षण मंडळाने सदर विषय केवळ कला शाखेसाठी ऐच्छिक केल्यामुळे एप्रिल-मे 2021 मध्ये होऊ घातलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना गणित विषया ऐवजी शिक्षणशास्त्र हा विषय निवडता येत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य शिक्षण मंडळाने केलेला हा बदल फक्त मंडळाच्या वेबसाईटवर टाकण्यात आला. सदर बदल संबंधित विषय शिकवणाऱ्या कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांना प्रत्यक्षपणे पत्र किंवा मेल द्वारे न कळविल्यामुळे सदर महाविद्यालय या बदलाबाबत अनभिज्ञ राहिलित. दोन वर्ष शिक्षणशास्त्र या विषयाचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आणि आता
ऐन फार्म भरण्याच्या तोंडावर शिक्षण मंडळाने केलेला बदल लक्षात आल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.या बदलामुळे संबंधित विषय शिक्षक अतिरिक्त होण्याचा सुद्धा धोका निर्माण झालेला आहे .त्यामुळे एप्रिल-मे 2021 मध्ये होणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षणशास्त्र विषय घेऊन प्रविष्ट होण्याची संधी देण्यात यावी अशी विनंती डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने शालेय शिक्षण विभाग म. रा. व राज्य शिक्षण मंडळाला केली आहे. अन्यथा महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ पं. दे. रा. शि. प.ने शासनाला आणि राज्य शिक्षण मंडळाला दिला आहे.
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना गणिता ऐवजी पर्यायी विषय निवडता यावा म्हणून शिक्षणशास्त्र या विषयाची संबंधित महाविद्यालयांनी शिक्षण उपसंचालक आणि विभागीय शिक्षण मंडळाची रीतसर परवानगी सुद्धा घेतलेली आहे. आणि हा विषय शिकवण्यासाठी तज्ञ विषय शिक्षकांच्या नियुक्त्या सुद्धा केल्या आहेत.
पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष 2019- 20 पासून राज्य शिक्षण मंडळाने सदर विषय केवळ कला शाखेसाठी ऐच्छिक विषय म्हणून ग्रुप सी मध्ये समाविष्ट केला, परंतु या बदलासंदर्भात साधे एक पत्र सुद्धा राज्य शिक्षण मंडळाने शिक्षणशास्त्र विषय शिकविल्या जाणार्‍या संबंधित महाविद्यालयांना पाठविले नाही. फक्त हा बदल वेबसाईट वर टाकून राज्य शिक्षण मंडळ मोकळे झाले. एवढेच नव्हे तर पुनर्रचित अभ्यासक्रमाचे बाबतीत इयत्ता अकरावीचे मागील वर्षी ऑफलाईन प्रशिक्षण आणि यावर्षी १ नोव्हेंबर २०२० रोजी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. या दोन्ही प्रशिक्षणामध्ये शिक्षणशास्त्र विषय शिकविणाऱ्या विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांना सहभाग प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले. परंतु यासंदर्भात साधी पुसटशी कल्पना सुद्धा शिक्षण मंडळाने संबंधित विषयाच्या शिक्षकांना दिली नाही.
विज्ञान शाखेतून हा विषय वगळल्या मुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानी सोबतच सदरील विषय शिकवणारे शिक्षक सुद्धा अतिरिक्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तरी शासनाने या विषयाकडे गांभीर्याने तत्काळ लक्ष घालून पूर्वीप्रमाणेच शिक्षण शास्त्र हा विषय विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना निवडण्याची व्यवस्था करावी आणि एच एस सी बोर्ड परीक्षा एप्रिल-मे 2021 मध्ये सदर विषय घेऊन प्रविष्ट होण्याची परवानगी देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. तसेच या बदलामुळे विषय शिक्षक अतिरिक्त होणार नाही याची दक्षता घ्यावी.यासाठी शालेय शिक्षण मंत्री मा.वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री मा.बच्चू कडू, विधान परिषद सदस्य मा.कपिल पाटील, मा. नागो गाणार, मा. विक्रम काळे, अप्पर उच्च शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा मॅडम, शिक्षण आयुक्त पुणे, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सचिव यांना निवेदन पाठविण्यात आलेली आहेत.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *