BREAKING NEWS:
महाराष्ट्र

पाथ्रट येथील अपघातातील मृत दाम्पत्याच्या कुटुंबियास वनविभागाकडून ३१ लाखांची नुकसान भरपाई वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते धनादेश वितरण

Summary

यवतमाळ, दि. 11 : दुचाकीने जात असतांना अचानक रोही (नीलगाय) आडवा आल्याने झालेल्या अपघातात पाथ्रट येथील पती, पत्नी यांचा दुर्देवी मृत्यु झाला. तर त्यांच्यासोबत असलेला मुलगा गंभीर जखमी झाला होता. अचानक आई – वडीलांचे छत्र हरविलेल्या या कुटुंबातील दोन्ही मुलांचे […]

यवतमाळ, दि. 11 : दुचाकीने जात असतांना अचानक रोही (नीलगाय) आडवा आल्याने झालेल्या अपघातात पाथ्रट येथील पती, पत्नी यांचा दुर्देवी मृत्यु झाला. तर त्यांच्यासोबत असलेला मुलगा गंभीर जखमी झाला होता. अचानक आई – वडीलांचे छत्र हरविलेल्या या कुटुंबातील दोन्ही मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी वनमंत्री संजय राठोड यांनी स्वत: पुढाकार घेऊन अपघातग्रस्त कुटुंबासाठी त्वरीत नुकसान भरपाई देण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार वनविभागाकडून 31 लक्ष 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई घोषित करण्यात आली. या रकमेचा धनादेश वनमंत्र्यांनी यश (वय 12) व प्रणय (वय 15) या बालकांकडे सुपूर्द केला.

दारव्हा तालुक्यातील पाथ्रटदेवी येथील निळूनाथ नारायण आमझरे (40), पत्नी निर्मला (35) आणि मुलगा यश (12)  हे तिघे 6 ऑगस्ट 2020 रोजी दुचाकीने राळेगावकडे जात होते. दरम्यान कळंब-राळेगाव मार्गावर त्यांच्या दुचाकीसमोर एक नर रोही अचानक आडवा आल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातात निळूनाथ व त्यांची पत्नी निर्मला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मुलगा यश याला गंभीर अवस्थेत प्रथम यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व तेथून नागपूर येथे उपचाराकरीता हलविण्यात आले.

 या अपघातानंतर जोडमोहा वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन रोही या वन्यप्राण्याच्या धडकेमुळेच हा अपघात घडल्याची खात्री केली. कळंब येथील क्षेत्र सहायक एल.के. उपाध्ये यांनी घटनास्थळी पंचनामा करून व वैद्यकीय अहवालावरून मृतकांसह गंभीर जखमीस वन विभागाच्या तरतुदीनुसार रोही या वन्यप्राण्यामुळे व्यक्ती मृत व जखमी झाल्याने नुकसान भरपाई देण्याबाबत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ उपवनसंरक्षक विभागास दिले.

 अपघातातील गंभीर जखमी यश आमझरे याच्या उपचारासाठी एक लाख 25 हजार आणि मृत निळूनाथ व त्यांच्या पत्नी निर्मला आमझरे यांना प्रत्येकी 15 लाख रूपये अशी एकूण 30 लाख रूपयांची  नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार यश व त्याचा मोठा भाऊ प्रणय निळूनाथ आमझरे (15) यांच्या नावे हे अर्थसहाय्य ‍विभागून देण्यात आले. याशिवाय यशच्या उपचारासाठी एक लाख 25 हाजरांचा निधी देण्यात आला. आमझरे दाम्पत्याची दोन्ही मुले अज्ञान असल्याने शासनाच्या तरतुदीनुसार अर्थसहाय्याची ही रक्कम अज्ञान अपत्यांसह अतिरिक्त जिल्हाधिकारी (नियमित) यांच्या नावे ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात रोही या वन्यप्राण्यामुळे झालेल्या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात धनादेश सुपूर्द करतांना वनमंत्र्यांसह जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ, यवतमाळचे उपवनसंरक्षक केशव बाभळे आदी उपस्थित हाते.

०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *