BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २९ सप्टेंबरला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभचा’ राज्यस्तरीय शुभारंभ – मंत्री मंगलप्रभात लोढा कोकण व नाशिक विभागात ४१८ हून अधिक रोजगार मेळावे; २५ हजारांहून अधिक रोजगार संधी

Summary

मुंबई, दि. २७: राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’चा राज्यस्तरीय शुभारंभ मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व […]

मुंबई, दि. २७: राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’चा राज्यस्तरीय शुभारंभ मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित हा कार्यक्रम श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ, चर्चगेट येथे होणार आहे. याच दिवशी कोकण व नाशिक विभागातील रोजगार मेळावे होणार आहेत.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री जयकुमार रावल, मंत्री आकाश फुंडकर, खासदार मिलिंद देवरा, खासदार अरविंद सावंत, महापौर रितू तावडे,यांच्यासह, बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. हेमलता बागला, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, आयुक्त डॉ. अमित सैनी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी यासह वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कोकण व नाशिक विभागात ४१८ रोजगार मेळावे

 कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या उपक्रमांतर्गत कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांत ४१८ हून अधिक रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमात कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग तसेच नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. या मेळाव्यांमधून स्थानिक स्तरावर २५ हजारांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. या महाकुंभ मध्ये १ हजार ५०० हून अधिक नामांकित कंपन्या आणि आस्थापना सहभागी होणार आहेत. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभव उपलब्ध रिक्त पदांशी जोडण्यासाठी ‘उमेदवार–रिक्त पद जुळवणी’ करण्यात येणार आहे. त्यामुळे युवक-युवतींना थेट रोजगार संधींसह उद्योगांच्या मनुष्यबळविषयक गरजा, आवश्यक कौशल्ये आणि विविध क्षेत्रांतील करिअर संधींची माहिती मिळेल. उद्योगांनाही आवश्यक मनुष्यबळ निवडण्याची सुविधा उपलब्ध होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि सॉफ्ट स्किल्सचे प्लेसमेंटपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रोजगार महाकुंभ मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार आणि उद्योजकांना क्यूआर कोडद्वारे नोंदणी करता येईल. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इच्छुकांनी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) किंवा जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘लाडक्या बहिणीं’साठी विशेष रोजगार मेळावा

या महाकुंभांतर्गत एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘लाडक्या बहिणीं’साठी स्वतंत्र रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यात सुमारे ६०० ते ७०० महिला उमेदवार सहभागी होणार आहेत. विविध कंपन्यांच्या स्टॉलवर महिलांना उपलब्ध पदे, आवश्यक पात्रता, कामाचे स्वरूप, वेतनश्रेणी आणि भरती प्रक्रियेची थेट माहिती मिळेल. कंपनी प्रतिनिधींशी संवाद साधण्याबरोबरच त्यांना मुलाखती देण्याची संधीही मिळणार आहे. महिलांच्या कौशल्याला रोजगाराची जोड देऊन त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे हा या विशेष मेळाव्याचा उद्देश आहे.

 ०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *