शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘ट्री प्लॅन्टेशन अँड मॉनिटिरिंग ॲप’ला राष्ट्रीय ‘डिजिटल इनोव्हेशन’ पुरस्कार
मुंबई, दि. २5 : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत आयोजित बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड २०२६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केलेल्या वृक्षारोपण व देखरेख ॲप (ट्री प्लॅन्टेशन अँड मॉनिटिरिंग ॲप) या संगणक प्रणालीला रस्ते व महामार्ग गटात डिजिटल इनोव्हेशन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार २४ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते यांनी विभागाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन या यशाबद्दल सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन पायाभूत सुविधांच्या उभारणीत तंत्रज्ञानाधारित व पारदर्शक प्रणालींचा अवलंब करत असून, त्याचदृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केलेल्या या डिजिटल उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेला सन्मान राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.
‘ट्री प्लॅन्टेशन अँड मॉनिटिरिंग अॅप’ ही प्रणाली रस्ते व महामार्ग प्रकल्पांअंतर्गत करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीचे अचूक नियोजन, नोंद व देखरेख सुनिश्चित करणारी डिजिटल यंत्रणा आहे. या अॅपद्वारे मोकळी जागा, वृक्षलागवडीसाठीचा खड्डा, प्रत्यक्ष लावलेले वृक्ष व ट्री गार्ड यांचे जिओटॅगिंगकेले जाते. तसेच स्थाननिर्देशांक व प्रत्यक्ष वृक्षांची छायाचित्रे नोंदविली जातात.
वृक्षलागवडीनंतर ठराविक कालावधीनंतर वृक्षांच्या वाढीचे निरीक्षण करून संबंधित छायाचित्रे, वृक्षाची उंची, घेर आदी माहिती प्रणालीमध्ये अद्ययावत केली जाते. वृक्ष पडताळणीसाठी कनिष्ठ अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता अशा विविध स्तरांवर प्रत्यक्ष स्थळावर जाऊन डिजिटल पडताळणीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे अप्रमाणित अथवा चुकीच्या अहवालांना प्रतिबंध होऊन पारदर्शकता वाढली आहे.
जिल्हानिहाय वृक्षलागवडीची प्रगती दर्शविणारा रियल टाईम डॅशबोर्ड विकसित करण्यात आला असून त्याद्वारे विविध स्तरांवर नियमित आढावा घेता येतो.
सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यात ८.२० लक्ष वृक्षलागवड पूर्ण करून त्यांचे जिओ टॅगिंग व छायाचित्रांसह डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात १५ लक्ष वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले असून त्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
या राष्ट्रीय सन्मानामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिजिटल व पर्यावरणपूरक उपक्रमांना बळ मिळाले असून राज्यातील पायाभूत विकास अधिक शाश्वत, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने विभागाची वाटचाल अधिक गतीमान झाली आहे, असे मंत्रीशिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे.
00000
