देशातील पहिल्या ‘रजोनिवृत्ती क्लिनिक्स’ची महाराष्ट्रात सुरुवात – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर महिलांच्या आरोग्य सेवेत राष्ट्रीय आदर्श
Summary
मुंबई, दि. २७ : महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या दूरदर्शी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यात शासकीय रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या […]
मुंबई, दि. २७ : महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या दूरदर्शी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यात शासकीय रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला राज्यभरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक व संवेदनशील टप्पा असून, या काळात शारीरिक, भावनिक व हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणावर जाणवतात. हार्मोनल असंतुलन, हाडांचे विकार, झोपेच्या तक्रारी, हृदयविकाराचा धोका तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या यांसारख्या बाबींकडे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत विशेष लक्ष देवून शासनाने रजोनिवृत्ती-केंद्रित आरोग्य सेवांना संस्थात्मक स्वरूप देत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
या रजोनिवृत्ती क्लिनिक्समध्ये महिलांसाठी एकाच छताखाली सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हार्मोनल, हाडे व हृदयाच्या आरोग्याची तपासणी, आवश्यक उपचार, औषधे तसेच जीवनशैलीविषयक मार्गदर्शन यांचा समावेश आहे.
या सेवांचा लाभ घेतलेल्या महिलांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली असून, हा उपक्रम आवश्यक, सन्मानजनक आणि महिलांना सक्षम करणारा असल्याची भावना व्यक्त केली आहे.
विशेष बाब म्हणजे, राज्यव्यापी व संघटित स्वरूपात रजोनिवृत्ती काळजी कार्यक्रम सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, त्यामुळे इतर राज्यांसाठी हा एक राष्ट्रीय आदर्श निर्माण झाला आहे. मकर संक्रांतीच्या दरम्यान या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, महिलांसाठी ही एक अर्थपूर्ण व आरोग्यकेंद्रित भेट ठरली आहे.
राज्याच्या विविध भागांतील महिलांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत शासनाची संवेदनशीलता व सर्वसमावेशक सार्वजनिक आरोग्यसेवेप्रती असलेली बांधिलकी याचे हे उत्तम उदाहरण आहे.
“रजोनिवृत्ती हा आजार नसून स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला या टप्प्यात सन्मानपूर्वक, योग्य वैद्यकीय मार्गदर्शन व उपचार मिळावेत, यासाठीच रजोनिवृत्ती क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत. महिलांचे आरोग्य सक्षम झाले, तर कुटुंब, समाज आणि राज्य अधिक सक्षम होईल.” असे राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांनी सांगितले.
हा उपक्रम सार्वजनिक आरोग्याबाबतच्या ठोस दृष्टीकोनाचे प्रतिबिंब असून, भारतात महिला-केंद्रित आरोग्यसेवेच्या दिशेने परिवर्तनकारी पाऊल म्हणून त्याचे व्यापक कौतुक होत आहे.
00000
