सरस्वती विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांत मतदान जनजागृती; रॅलीद्वारे लोकशाहीचा संदेश
Summary
अर्जुनी मोर : स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे २५ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. लोकशाही व्यवस्थेतील मतदानाच्या महत्त्वाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य […]
अर्जुनी मोर :
स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे २५ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. लोकशाही व्यवस्थेतील मतदानाच्या महत्त्वाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य जे. डी. पठाण होते. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती ज्योती कांबळे (उपविभागीय अधिकारी, अर्जुनी/मोर), अनिरुद्ध कांबळे (तहसीलदार, अर्जुनी/मोर), सुभाष बागडे (गटशिक्षणाधिकारी), बेनीराम भानारकर (विस्तार अधिकारी), नाजुकराव लंजे (विस्तार अधिकारी), विलास काशीवार, उपप्राचार्या अर्चना गुरुनुले, पर्यवेक्षक शिवचरण राघोते यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकशाही व्यवस्थेचा कणा म्हणजे मतदान. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, निस्वार्थीपणे आणि निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची जबाबदारी आहे. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा मूलभूत अधिकार असून तो आवर्जून बजावला गेला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना मतदार दिनाची शपथ देण्यात आली. यानंतर आरएसपी, स्काऊट-गाईड व राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) अंतर्गत विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला उपविभागीय अधिकारी श्रीमती ज्योती कांबळे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुजित जक्कुलवार यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून लोकशाही मूल्यांची जाणीव अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
