व्यक्तींना भविष्यकाळात होणाऱ्या घटना स्वप्नात वा मनःश्चक्षूंसमोर दिसतात ??
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि.४ मे. २०२१
माणसांच्या दैनंदिन झोपेचा २५ ते ३०% भाग हा स्वप्नांचा असतो. यांपैकी फारच थोडी स्वप्ने सकाळी झोपेतून उठल्यावर आठवतात. स्वप्नात घडणाऱ्या घटना प्रत्यक्षात बहुधा घडत नाहीत. म्हणूनच स्वप्नात एखादी व्यक्ती मृत झालेली दिसल्यास तिचे आयुष्य वाढते, असेही समजले जाते. अर्थ एवढाच, की स्वप्नात व्यक्तींचा मृत्यू बऱ्याचदा दिसतो, तो प्रत्यक्षात क्वचितच खरा ठरू शकतो. (मनाला दिलासा देण्यासाठी व्यक्तीचे आयुष्य यामुळे वाढणार, ही अंधश्रद्धा त्याला जोडली जाते.) परंतु योगायोगाने एखादे स्वप्न खरे ठरते आणि त्याचा हजार ठिकाणी बोलबाला होतो. त्यामुळे स्वप्नात पुढील भविष्याची सूचना मिळणे लोकांना खरे वाटते. हजार खोट्या ठरलेल्या स्वप्नांची चर्चा मात्र इतरत्र होत नाही. स्वप्न खरे ठरतानाही काय घडते? व्यक्तीच्या अंतर्मनात काही विचार असतात, भीती असते. व्यक्तीला स्वतःला त्याची पूर्ण जाणीव राहात नाही. एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या तब्येती बद्दल त्याच्या मुलाच्या मनात काळजी आहे.ही जाणीव अबोध पातळीवर असते. अशा वेळी त्या व्यक्तीसारखी दिसणारी एखादी व्यक्ती अचानक वारली वा त्या वृद्धाच्या रोगानेच आजारी आहे.असे अन्य रुग्णा समोर आला तर मनात निर्माण होणारे विचार-तरंग स्वप्नात घटनारूपाने दिसतात. उत्कट इच्छा असते ते घडले असे, वा जे घडू नये अशी उत्कंट इच्छा असते ते घडले या दोन्ही स्वरुपांची स्वप्ने पडू शकतात. यांपैकी काहीही घडल्यास त्याची प्रचीती आल्यासारखी वाटते. प्रत्यक्षात अंतर्मनातील विचारावर आधारीतच स्वप्ने पडत असल्याने तसे विचार प्रत्यक्षात येण्याची जी धूसर शक्यता असते, त्या प्रमाणात ती स्वप्ने खरी ठरण्याचीही शक्यता असते. त्यात विशेष असे काही नाही.
( डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या पुस्तकातून साभार)