डॉ.दीपक शिकारपूर यांच्या पुस्तकामुळे संगणक क्षेत्रातील संभाव्य धोके टाळण्यास मदत होईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
Summary
पुणे, दि. २:- संगणक क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असतांना या क्षेत्रातील संभाव्य धोके टाळण्यास डॉ. दीपक शिकारपूर यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जागतिक साक्षरता दिनानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘डिजीटल तंत्रज्ञानाचे […]
पुणे, दि. २:- संगणक क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असतांना या क्षेत्रातील संभाव्य धोके टाळण्यास डॉ. दीपक शिकारपूर यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
जागतिक साक्षरता दिनानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘डिजीटल तंत्रज्ञानाचे धोके व सावध, सुरक्षित वापर’ पुस्तक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरदराव कुंटे, प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या उपप्राचार्या स्वाती जोगळेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, संगणक युगात प्रगती करीत असतांना तंत्रज्ञानाचे फायद्यासह तोटेदेखील आहेत. राज्यात साध्या गुन्ह्याच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. गुन्हे सिद्धतेचे प्रमाणही सायबर गुन्ह्यामध्ये खूपच कमी आहे. संगणक निर्मिती करतांना त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करण्यामध्ये मेंदू वापरला जातो. या पुस्तकामुळे संगणक युगात निर्माण होणाऱ्या अडचणी कमी करण्यास मदत होईल, असेही श्री. पाटील म्हणाले.
जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भटकर म्हणाले, ‘डिजिटल तंत्रज्ञानाचे धोके व सावध, सुरक्षित वापर’ या पुस्तकामुळे संगणक वापरतांना सावधानता बाळगण्याविषयी माहिती मिळण्यास मदत होईल. संगणक व तंत्रज्ञान या विषयातील शब्द मराठी भाषेतून वृत्तपत्रात आले पाहिजे, या शब्दाचा व्यवहारात वापर केल्यामुळे मराठी भाषा प्रगल्भ होण्यास मदत होईल. संगणक क्रांतीमध्ये अफाट बदल होत असतांना संगणक व तंत्रज्ञान विषयाची माहिती सर्वांना समजेल अशा मायबोली भाषेत उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ. शिकारपूर यांचे त्यांनी अभिनंदन केले.
श्री. कुंटे म्हणाले, आपल्यापुढे सायबर सुरक्षिततेचे गंभीर आवाहन आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत बैठक घेवून याविषयी जागृता निर्माण करण्याचे काम फर्ग्युसन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात येणार आहे. सायबर सुरक्षा विषयाची माहिती शिक्षण क्षेत्रात आणण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.