राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता शिवभोजन थाळी देखील मिळणार पार्सल
मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा थैमान वाढला आहे. यामुळे, महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात हॉटेल, बार, रेस्टोरंट बंद करण्याचे आदेश देण्यात असून परगावातून आलेल्या वा घरच्या घरी जेवणाची सोय ज्यांची होऊ शकत नाही अशा नागरिकांसाठी रात्री आठ पर्यंतच पार्सल वा टेक अवे सुविधा सुरु ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, हॉटेल मधील पार्सल हे अनेक लोकांना परवडणारे व सोयीचे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. आता, राज्य सरकारने गरजूंसाठी सुरु केलेली शिवभोजन थाळी ही पार्सल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत, राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे.
‘कोरोना काळात मजुर,कामगार,शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे.राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार आहे.’ अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, ‘सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केला नसून पूर्वीप्रमाणेच ५ रूपयात शिवभोजन थाळी जनतेला उपलब्ध होणार आहे.’ यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
✍️ प्रशांत जाधव
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर